देशभर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जो वेळ उपलब्ध होतो आहे, त्याचा काही तरी चांगला उपयोग करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक सेलिब्रिटी करतो आहे. आपण काय करतो आहोत, हे आपल्या फॅन्सना सांगण्यासाठी सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओदेखील व्हायरल केले जात आहेत. भोजपुरी ऍक्ट्रेस मोनालिसाने हा मोकळा वेळ आपल्या वर्कआऊटसाठी वापरायचे ठरवले आहे. तिने वेगवेगळे व्यायामप्रकार करण्याबरोबर थोडा हेवी वर्कआऊटही करायला सुरुवात केली आहे.
इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती डंबेल्स घेऊन व्यायाम करताना दिसते आहे. तिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यात “बर्फी’मधील रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रावर चित्रीत झालेल्या “इतनीसी हंसी’ या गाण्यावर ती मनसोक्त डान्स करताना दिसते आहे.
आपल्या बेडरूममध्ये सोफ्यावर उड्या मारत ती स्वच्छंदपणे डान्स करते आहे. आपल्या फॅन्सनादेखील तिने अशाच प्रकारे डान्स करण्याचे आणि घरबसल्या व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे. स्वतःला फिट ठेवायचे असेल, तर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असेही तिने म्हटले आहे.