पिंपरी – जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दि. 07 ते 17 ऑगस्ट दरम्यान करोनासोबत जगताना या विषयावरील फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून यामध्ये शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सध्या संपूर्ण जगामध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल घडलेला आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मर्यादित प्रवाशांसह वाहन प्रवास करणे, मर्यादित कर्मचाऱ्यांसह कार्यालयीन कामकाज करणे आदी बाबींचा दैनंदिन जीवनामध्ये नव्याने समावेश झाला आहे. करोनासोबत जगताना दैनंदिन जीवनामध्ये आलेल्या बदलांचे चित्रण स्पर्धकांच्या छायाचित्रांमधून दिसणे अपेक्षित आहे.
स्पर्धेसाठी 21 वर्षाखालील गट, महिला गट व खुला गट असे तीन गट करण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकांसाठी दोन हजार रुपये व प्रशस्तीपत्रक तर दोन उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये व प्रशस्तीपत्रक अशा स्वरुपाची बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त व आर्टिस्ट कम फोटोग्राफर परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक छायाचित्रकारांनी विलास साळवी (मो.क्र. 8855892803) व खुशाल पुरंदरे (मो.क्र. 9665875088) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.