#Photo_Gallery : पाण्याची वाट अडविल्याने जलप्रलय

नदीपात्रातील अतिक्रमणांचा मोठा फटका
नैसर्गिक जलप्रवाह संपवले, पूररेषेतही बांधकामे

पिंपरी – गेल्या दोन दिवसांपासून पुराने शहरात थैमान घातले आहे. पूर येण्यासाठी केवळ अत्याधिक पाऊसच जबाबदार नसतो, तर त्या पाण्याची वाट अडविणारे चुकीचे कृत्य देखील जबाबदार असते. निसर्गाशी मानवाने केलेला खेळच निसर्गाच्या कोपाचे कारण बनतो. सुमारे एक तपानंतर शहर पुन्हा एकदा भीषण पूर अनुभवत आहे. बुझवलेले ओढे-नाले, नदीपात्रात टाकलेला राडा-रोडा, पूररेषेत केलेले बांधकाम या बाबी पुरासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट
होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस पडत नाही, आपले शहर हे समुद्रतटावरही वसलेले नाही. या आपल्या जमेच्या बाजू असल्या तरी आपल्या शहराचा इतिहास पाहिल्यास 1982, 2005 आणि 2007 साली पिंपरी-चिंचवड शहराने देखील मोठे पूर पाहिले आहेत. सुदैवाने त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सावध राहणे आवश्‍यक असतानाही पुरासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यात आली.

पूररेषेतील अनधिकृत बांधकामे
पिंपरी-चिंचवड शहरातून मुळा नदी 10.90 कि. मी., पवना नदी 25 कि. मी. आणि इंद्रायणी नदी 20.60 कि. मी. वाहते. शहराची वाढीव हद्दीची विकास योजना करताना राज्य शासनाने पूररेषा अंतर्भूत करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने जलसंपदा विभागाकडून तीनही नद्यांचे सर्वेक्षण करून पूररेषेची आखणी करून घेतली होती. शहरातील पूररेषेत वाढलेली बांधकामे आणि या बांधकामांमुळे अरुंद होत चालेले नदीपात्र मुख्य काळजीचे कारण बनले आहे. तत्कालीन मनपा आयुक्‍त श्रीकर परदेशी यांनी नदीपात्रातील बांधकामांवर बडगा उगारला होता. त्यानंतर तशी मोठी कारवाई पुन्हा झाली नाही. लहान-मोठी बांधकामे सातत्याने वाढतच आहेत. पालिकेने बांधकामे काढल्यानंतर काही दिवसांनी परत तिथे लोखंडी शेड उभारण्यात आले आहेत. ही बांधकामे करताना भराव टाकून उंची निर्माण केली गेली आहे. नदीत टाकलेल्या राडा-रोड्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून जलप्रवाहाची नैसर्गिक संरचना बदलली आहे.

पूररेषेबाबत गांभीर्य नाही
पाटबंधारे विभागाने महापालिकेच्या हद्दीतील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या पूररेषा आखल्या आहेत. या विभागाने निषेधक आणि नियंत्रक पूररेषा निश्‍चित करून काट छेद नकाशे महापालिकेला दिले आहेत. महापालिकेच्या 1995 च्या मंजूर विकास आराखड्यावर आणि 1997 मध्ये महापालिकेत समाविष्ट प्राधिकरण क्षेत्राच्या विकास आराखड्यावर तसेच वाढीव हद्दीच्या प्रारूप विकास योजना आराखड्यावर पूररेषांचे ‘सुपर इंपोझिंग’ करण्यात आले आहे. 1995 च्या मंजूर विकास आराखड्यावर आणि 1997 मध्ये महापालिकेत समाविष्ट प्राधिकरण क्षेत्राच्या विकास आराखड्यावर पूररेषा आखणीनुसार कायदेशीर कार्यवाहीची अमंलबजावणी सातत्याने होणे अत्यावश्‍यक होते, परंतु त्यातही दिरंगाई झाल्याने सुमारे बारा वर्षानंतर पुन्हा एकदा

शहरवासियांनी पूर अनुभवला. नेहमीच शिरते पाणी
25 ते 30 वर्षापूर्वी नद्यांच्या तीराजवळ शेत जमिनी होत्या. त्यावेळी नदीला पूर आला तरी लोकवस्तीला बाधा पोहचत नव्हती. परंतु, नंतरच्या कालखंडात मात्र नद्यांच्या पात्राजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊ झाले. दरवर्षी थोड्याशा पुरानेही असे भाग पूर बाधित होत आहेत. 1982 मध्ये आलेल्या मोठ्या पुरानंतर 2005 आणि 2007 साली या शहराने मोठे पूर पाहिले आहेत. परंतु दरवर्षी पावसाळ्यात शहरातील काही ठराविक भाग नेहमीच पाण्याखाली जातात आणि संपूर्ण यंत्रणा कामाला लागते.

बुजविले ओढे-नाले 
विकास व महत्त्वाकांक्षाच्या आंधळ्या शर्यतीत या शहरात सर्व नियमांना धाब्यावर बसवून कित्येक ओढे-नाले बुजविण्यात आले. ओढे-नाले हे नैसर्गिक जलप्रवाह असतात. निसर्गचक्रानुसार हे जलप्रवाह पावसाळ्यात अतिरिक्‍त पाणी वाहून योग्य ठिकाणी घेऊन जातात. याच ओढ्या-नाल्यांना बुजवून त्यावर बांधकामे करण्यात आली आहेत. केवळ नागरिकच नव्हे तर प्रतिष्ठित मंडळींनी देखील ओढ्या-नाल्यांवर बंगले आणि इमारती बांधल्याचे किस्से या शहरात आजही चर्चिले जातात. पालिकेच्या पावसाळी ड्रेनेज लाईनमध्ये पावसाचे संपूर्ण पाणी वाहून नेण्याची क्षमता नाही. ही क्षमता केवळ त्या निसर्गाने तयार केलेल्या ओढे आणि नाल्यांमध्येच होती. नदीच्या दोन्ही काठावर वसलेल्या या शहरात एकेकाळी नदीला जोडणारे कित्येक ओढे होते, आज ते सर्व नामशेष झाले आहेत.

 

महापालिकेने पूररेषेतील बांधकामांना परवानगी दिलेली नाही. मात्र, पूररेषेत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे शहरात आज धोकादायक परिस्थिती उद्‌भवली आहे. ही परिस्थिती पाहता अशा बांधकामांवर कारवाईची गरज आहे. पूररेषेतील बांधकामांविरोधात कारवाईच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

– राहुल जाधव, महापौर.

शहरात एकेकाळी दोनशेहून अधिक ओढे-नाले होते. आज केवळ 46 नाले उरलेले आहेत. पाऊस जमिनीत मुरतच नाही. पावसाळी नाले देखील सिमेंट कॉंक्रिटचे करण्यात आले आहेत. पाणी वेगाने नदीच्या दिशेने वाहून जाते. शहरात कित्येक दगडाच्या खाणी आहेत, त्या देखील हळूहळू बुजविल्या जात आहेत. या खाणींमध्ये पावसाळी पाणी सोडण्याची व्यवस्था असती, तर पाणीसाठा वाढला असता. आज पूर संकट वाटत आहे, काही महिन्यांनी पाणी टंचाई हे संकट वाटेल. पूर्वी जेवढे पाणी जमिनीत मुरत होते, तळ्यांमध्ये जात होते, त्याचे निम्मे पाणीही जात नाही. हे मोठे दुर्दैव आहे. पुराची स्थिती निर्माण होण्यामागील ही महत्त्वाची कारणे आहेत.

– विकास पाटील, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)