पुणे – जिल्ह्यातील भोर तालुका हा सह्याद्री पर्वतरांगामधे येतो. भोर हा निरा नदीच्या काठावर वसलेला छोटासा तालुका. या तालुक्याच्या ठिकाणापासून ३२ कि.मी. अंतरावर पश्चिम दिशेला वेळवंडी नदीच्या काठावर कांबरे हे गाव वसले आहे.
कांबरे हे तसं छोटसं गाव, पण या गावाला एका बाजूला वेळवंडी नदी आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री डोंगररांगा यामुळे खूपच सुंदर असं निसर्गवैभव लाभलं आहे.
कांबरे हे गाव निसर्गाच्या कुशीत वसले आहे. गावाच्या दक्षिण बाजूस वेळवंडी नदी वाहत आहे. या नदीमध्ये एक प्राचीन शिवमंदिर असून हे मंदिर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे ते मंदिर कांबरेश्वर या नावाने ओळखले जाते.
या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते पांडवकालीन असून पांडवांनी बांधले आहे, अशी आख्यायिका आहे. म्हणजे हे मंदिर किती प्राचीन आहे याची आपल्याला कल्पना येते. “कांबरेश्वराचा हर हर महादेव” या गजरात कांबरेश्वराचा आशिर्वाद घेऊन येथील शेतकरी आपला शेतीचा वारसा जपत आहेत.