मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्यांच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केला त्याचा फोटो समोर आला आहे. सैफ अली खान याच्यावर त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरात हल्ला करण्यात आला. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याला वांद्रे स्टेशनमध्ये आणण्यात येणार आहे.
घटनेच्या वेळी नेमके काय घडले?
या हल्लेखोराला सगळ्यात आधी करिना कपूरने पाहिलं. रात्री 1.30 वाजता करिना पार्टीवरून घरी परत आली, तेव्हा घरात येताच करिनाला हॉलमध्ये एक व्यक्ती दिसली. यानंतर करिनाने आरडाओरडा सुरू करताच मोलकरीण बाहेर आली, तोच चोराने मोलकरीणीवर हल्ला केला. यानंतर करिना तैमुरला घेऊन बेडरूमच्या दिशेने पळाली.
आरडाओरडा ऐकल्यानंतर सैफ बेडरूममधून पळत आला. तेव्हा मोलकरीण आणि चोराची झटापट सुरू होती, त्यामुळे सैफ मोलकरीणाला वाचवायला गेला, तोच चोराने सैफच्या हातावर चाकूने हल्ला केला. जखमी झालेला सैफ मागे होताच चोराने सैफच्या पाठीत आणि मानेवर वार केला. यानंतर चोर मुख्य दरवाजाने पळून गेला. यानंतर करिना सैफला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.
आरोपी आतमध्ये कसा घुसला ?
आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आला. त्यानंतर इमारतीच्या नजीक पोहोचल्यानंतर त्याने दुसऱ्या एका इमारतीत शिरूर सैफच्या इमारतीत शिरकाव केला. इमारतीत जरी चोरटा शिरला असला तरी त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा आहे. इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करायलाही ॲक्सेस कार्डचा वापर करावा लागतो. त्यात इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे सहजासहजी इमारतीच्या आत शिरणे सोप्पे नाही आहे. मात्र चोरट्याने सैफच्या घरात शिरण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केला.
दोन जण अद्याप फरार
सैफ अली खानच्या घरात तीन हल्लेखोर शिरले होते. यापैकी एका हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अद्याप दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.