मुंबई – आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत असणारी कंगना राणावत मथुरेमध्ये बांके बिहारी- वृंदावनमधील कृष्णजन्मभूमीचे दर्शन घ्यायला पोहोचली. या धार्मिक भेटीची माहिती तिने स्वतः
इन्स्टाग्रामवरून दिली आहे. मथुरेतील कृष्णजन्मभूमीचे दर्शन घेतानाचे फोटो तिने पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच आनंदी दिसते आहे.
तिचा चेहरा भक्तीने उजळलेला दिसतो आहे. एका फोटोमध्ये तिच्या बरोबर एक मुलगा आहे आणि तो कंगनाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो आहे. मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचे दर्शन घेणे हा खूपच रोमांचकारी अनुभव आहे. हे स्थान अतिशय संवेदनशील आहे, असे तिने आपल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
या ठिकाणी कोणालाही फोटो घेण्याची परवानगी नाही. मात्र, माता देवकी आणि वासुदेव यांना ज्या तुरुंगात ठेवले गेले होते, ते ठिकाण पाहुण्यांना पाहता येऊ शकते, अशी माहितीही कंगनाने दिली आहे.
कृष्णजन्मभूमीच्या ठिकाणी सशस्र सेना दलांना बघून दुःख होते असेही तिने म्हटले आहे. आता सर्वेश मेवाराच्या “तेजस’मध्ये कंगना दिसणार आहे. याशिवाय “धाकड’ आणि “इमली’ मध्ये लीडरोलमध्येही ती दिसणार आहे.