राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार

गृहमंत्रालयाने दिले चौकशीचे आदेश

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन युती सरकारने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींचे फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही बड्या नेत्यांचे फोन आणि व्हॉट्‌सऍप टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कांग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही माध्यमांसमोर काही आरोप केले होते. त्यानंतर आता याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्यांचा कोणाचा यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे प्रकार घडत असतील तर यापुढे सर्वसामान्यांचेही फोन केले जाऊ शकतात. यावर चाप लावणं आवश्‍यक आहे. सरकार त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले होते.

तर संजय राऊत यांनीदेखील फोन टॅपिंगची आपल्याला कल्पना होती, असे म्हटले होते. तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. जर माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही. ऐका माझं बोलणं,अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here