नानासाहेब पवार
नेवासा – ‘त्या’ नालायकांमुळे सगळ्यांचच बंद करण्याची पाळी आलेली आहे. मी पोलीस स्टेशनवरून निघालोय. मी पोचायच्या आत जेवढी वाहने काढून निघून जाता येईल, तेवढ तातडीने जायचं. आणि कायमस्वरूपी बंद. जोपर्यंत पुढील माझा आदेश येत नाही तोपर्यंत…! नेवासा पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकारी अन् वाळूतस्करामधील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिपने नेवासा तालुक्यात खळबळ माजली आहे.
नेवासा पोलीस स्टेशनच्या अधिकार्याचे व वाळूतस्कराचे मोबाईलवरील हे संभाषण कालपासून सोशल मीडियावर चांगले वायरल होत आहे. मोबाईलवरील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप वाळूतस्कर व नेवासे पोालीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्यातील असल्याची चर्चा रंगली आहे. या क्लिपमुळे नेवासा पोलीस यंत्रणेत अस्वस्थता पसरली आहे.
नेवासा तालुक्यात सध्या अवैध वाळू उपश्याने जोर धरला आहे. त्यामध्ये गोदावरी नदीकाठच्या जैनपूर, बेलपिंपळगाव, घोगरगाव आदी गावांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. त्यामुळे येथील नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत.
प्रशासनाकडे तक्रार करूनही वाळू उपसा चालूच असल्याचा आरोप तेथील ग्रामस्थ करत आहेत. त्यातच काल सोशल मीडियावर क्लिप वायरल झाली. त्यामध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी व एका वाळूतस्कराशी मोबाईलवर संभाषण करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, ही क्लिप खरी की बनावट, याचा तपास व्हायला हवा. मात्र, त्या संदर्भात अजून कोणतीही निर्णय झालेला नाही. क्लिप बनावट असल्यास ती बनविणार्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला हवा, अशीही चर्चा आहे. मात्र, खरी असल्यास पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अवैध धंदे बंद केल्याने माझ्या विरोधात षड्यंत्र – पोलीस निरिक्षक विजय करे यांचे माध्यमांना स्पष्टीकरण नेवासा पोलीस स्टेशनअंतर्गत अवैध वाळू उपसा व वाळूची तस्करी पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे वाळूतस्कर, त्यांचे हस्तक किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या कोणीतरी व्यक्तीद्वारे अशा प्रकारची बनावट क्लिप तयार करून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अशाप्रकारे बदनामी करून व वेठीस धरून आमचे कर्तव्य कठोरपणा व शिस्तप्रिय काम करण्यापासून आम्हास कोणीही रोखू शकत नाही. अवैध धंदे तोडणे गुन्हेगारांवर वचक व पोलीस प्रतिमा उंचावून लोकाभिमुख काम करण्याकडे आमचा कल आहे. आमचे शेताचे बांधावर जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे व कामाच्या धडाक्यामुळे काही असामाजिक तत्त्वांकडून अशाप्रकारे बनावट क्लिप तयार करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. अवैध धंदे बंद केल्यामुळे आपल्या विरोधात हे षड्यंत्र उभारण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण पोलीस निरीक्षण विजय करे यांनी माध्यमांना पाठविले आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण…!
कथित पोलीस अधिकारी : बेलपिंपळगावमध्ये फार उच्छाद मांडलाय तुम्ही..
कथित वाळू तस्कर : नाही सर, आम्ही नव्हतो सर..
कथित पोलीस अधिकारी : कोणी जे असतील ना, त्या नालायकांमुळे सगळ्यांच बंद करण्याची पाळी आलेली आहे. मी पोलीस स्टेशनवरून निघालोय. मी पोचायच्या आत जेवढी वाहने काढून निघून जाता येईल तेवढ जायचं. आणि कायमस्वरूपी बंद. जोपर्यंत पुढील माझा आदेश येत नाही तोपर्यंत…
कथित वाळू तस्कर : जी सर, जी सर, जी सर..
कथित पोलिस अधिकारी : तर मी निघणार. जेवढी वाहने मिळतील तेवढी सिझ करणार जप्त करणार. जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला विड्रॉल करता येईल तेवढं करून टाका.
कथित वाळू तस्कर : जी सर सगळे बाजूला झाले.
कथित पोलीस अधिकारी : आता कायमस्वरूपी बंद. आता मी सांगत नाही तोपर्यंत.
कथित वाळू तस्कर : जी सर
पोलीस निरीक्षक विजय करे यांची तत्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्या ऑडिओ क्लिप संदर्भात त्यांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
– मनोज पाटील, पोलीस अधीक्षक