पुणे- पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याच्या फोनने प्रशासन आणि पोलिसांची एकच धांदल उडाल्याचे मंगळवारी सायंकाळी पहावयास मिळाले. दरम्यान, संपूर्ण स्टेशन परिसराची तपासणी केले तेव्हा कोणतीही संशयास्पद वस्तू मिळून आली नाही. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने सुटकेचा निवास सोडला. ही अफवा पसरवणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचा दूरध्वनी पुुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षास आला होता. बॉम्ब ठेवल्याची जागा दाखवितो. त्यासाठी 7 कोटी रुपये द्यावे लागतील, असे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. त्यानंतर पुणे पोलिसांचे बॉब शोधक नाशक पथक रेल्वे स्थानकात दाखल झाले. रेल्वे स्थानक परिसराची तपासणी करण्यात आली. तेव्हा बॉम्बसदृश कोणतीही वस्तू आढळून आली नाही. दूरध्वनी करून अफवा पसरविणाऱ्याचा शोध घेण्यात येणार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.