नगर -समाजाला निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांची खरी गरज आहे. फिनिक्स फाउंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेने सुरु आहे. अनेक वर्षापासून गरजू घटकातील नागरिकांना माणुसकीच्या भावनेने आरोग्यसेवा देण्यात येत आहे. महागाईच्या काळात आरोग्यसेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना न परवडणारी झाली आहे. फिनिक्सचे आरोग्य शिबीर गरजूंना आधार बनली आहेत.
महात्मा फुलेंच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्कारासाठी देखील निस्वार्थ भावनेने कार्य केलेल्या योग्य व्यक्तींची निवड झाल्याचे, प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात करोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेले बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, सावली संस्थेचे नितेश बनसोडे व अमरधाम येथील सेवक स्वप्निल कुर्हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार कर्डिले बोलत होते.
यावेळी राम पानमळकर, बापूसाहेब शिंदे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अय्युब पठाण, मयुर पाखरे, गौरव बोरुडे, अमोल धाडगे, राजू ताजणे, मयुर पाखरे, सौरभ बोरुडे, सुरेश नन्नवरे आदी उपस्थित होते. जालिंदर बोरुडे यांनी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदी काळात फिनिक्स सोशल फाउंडेशन सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरला असून, टाळेबंदीत गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने विविध शिबीरे घेण्यात आली. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 378 ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामधील 67 लाभार्थींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार आहे.