उपाध्यक्षा सारा दुतेर्ते यांनी शनिवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना एक खळबळजनक आरोप केला होता. जर आपली हत्या झाली तर अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर, त्यांची पत्नी आणि प्रतिनिधीगृहाच्या सभापतीची हत्या करण्यासाठी आपण एका मारेकऱ्याशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी म्हटले होते. हत्येची ही धमकी म्हणजे विनोद नसल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.
सारा दुतेर्ते यांच्या या धमकीनंतर पोलीस आणि लष्कराने तातडीने अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे. या धमकीबाबत दुतेर्ते यांना तपासासाठी पाचारण केले जाणार असल्याचे न्याय विभागानेही म्हटले आहे. दुतेर्ते यांची धमकी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेलाच धोका असल्याचे नॅशनल सिक्युरीटी कौन्सिलने म्हटले आहे.
जर मी मारली गेली, तर सूडासाठी मी अध्यक्षांची हत्या कशी का करेन ? मी अध्यक्षांची हत्या करण्याचे काहीही कारण नाही. त्यांची हत्या केल्याने मला काय फायदा, असे दुतेर्ते यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे आपल्या हत्येच्या कटाविरोधात लढण्यास आपण तयार असल्याचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी म्हटले आहे.
उपाध्यक्षा दुतेर्ते या मार्कोस यांच्या आगोदर अध्यक्ष राहिलेल्या रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या कन्या आहेत. मार्कोस यांच्याबरोबरच्या मतभेदांमुळे कधी कधी त्यांची हत्या करायचा विचार आपल्या मनात येत असल्याचे सारा दुतेर्ते यांनी यापुर्वीही म्हटले आहे.
एकेकाळचे सहकारी बनले शत्रू…
फिलीपीन्समध्ये २०२२ च्या मे महिन्यात झालेल्या निवडणुकीतत मार्कोस हे अध्यक्ष आणि दुतेर्ते या उपाध्यक्ष म्हणून मोठ्या फरकाने विजयी झाले होते. दोघांनी प्रचारादरम्यान राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिले होते. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये अल्पावधीतच मतभेद निर्माण झाले होते. दक्षिण चीन समुद्रात चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या मुद्यावर हे मतभेद तीव्र होते.
दुतेर्ते यांनी जूनमध्ये शिक्षण मंत्री आणि घुसखोरीविरोधी संस्थेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. फिलीपीन्सच्या राज्यघटनेनुसार जर अध्यक्षांचे अकाली निधन, हत्या, अपंगत्व अथवा राजीनामा दिला गेल्यास उपाध्यक्ष उर्वरित काळासाठी अध्यक्ष बनू शकतात.