मनिला – फिलिपाईन्सच्या दक्षिणेकडे एका लष्करी विमानाला अपघात होऊन त्यात किमान 29 जण ठार झाले असून अन्य सुमारे चाळीस जण जखमी झाले आहेत. या विमानात 92 जण प्रवासी होते व ते बहुतेक लष्कराचेच जवान किंवा अधिकारी होते.
दुर्घटनाग्रस्त विमान हे सी-130 हर्क्युलिस जातीचे होते. ते लष्करासाठी मालवाहू विमान म्हणून वापरले जात होते. सुलू प्रांतातील जोलो बेटावरील विमानतळावर हे विमान उतरत असताना हा अपघात झाला. धावपट्टी नजिकच हे विमान कोसळले असे काहीं सूत्रांनी सांगितले. कोसळलेल्या विमानाला लगेच आग लागली. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जात आहे.
या विमानात नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेले अनेक अधिकारी होते. त्यांना प्रथमच लष्करी ठिकाणांवर तेैनात करण्यासाठी या विमानातून नेले जात असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे.
दक्षिण फिलिपाईन्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी गट सक्रिय झाल्याने तेथे लष्कराच्या मदतीने कारवाई सुरू आहे. त्यामुळे हे जादाचे लष्करी बळ तिकडे तैनात केले जाणार होते. अपघातात विमानाचे तिन्ही वैमानिक ठार झाले असल्याचे वृत्त आहे.