माऊलींच्या स्वागतासाठी फलटणनगरी सज्ज

फलटण – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा आषाढीवारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे जात असताना सातारा जिल्ह्यात 4 दिवस वास्तव्यास असून त्यापैकी 3 दिवस फलटण तालुक्‍यात माऊलींचे वास्तव्य असल्याने सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी, भाविक या सर्वांना आवश्‍यक सुविधा देण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दि. 3 रोजी तालुक्‍यात माऊलींचे आगमन होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा सौ. नीताताई मिलिंद नेवसे, नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, आरोग्य सभापती अजय माळवे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी किशोर माने, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यवस्थेचा आढावा नुकताच घेतला आहे.

दि. 3 रोजी माऊलींचे फलटण तालुक्‍यात आगमन होत असून दि. 3 रोजी तरडगाव नजीक सोहळ्यातिल पहिले उभे रिंगण आणि मुक्काम, दि. 4 रोजी फलटण शहरात मुक्काम असणार आहे. 5 रोजी बरड़ येथे मुक्काम असून 6 रोजी सोलापूर जिल्ह्यात सोहळा जाणार आहे. प्रशासनाच्यावतीने दि. 3 रोजी सरदेचा ओढा येथे माऊलीचे स्वागत प्रशासनातर्फे होणार आहे.

प्रशासन सर्व पातळीवर सज्ज
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळ्यातील दिंडीकरी, वारकरी भाविक यांना प्रामुख्याने सुरक्षितता, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचा गॅस व रॉकेल, वीज याचा योग्य पुरवठा व व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनातील संबंधीत यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडल्याचे या आढाव्यादरम्यान निदर्शनास आले आहे. तथापी त्यामधील काही पूर्तता अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत संबंधीत यंत्रणांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सोहळ्याचे फलटण तालुक्‍यात आगमन होईल तोपर्यंत सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात येईल याची ग्वाही प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

आरोग्य विभाग सज्ज
फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुभाष गायकवाड व तालुका आरोग्याधिकारी डॉ. पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांचे पाणी साठे तपासून घेवून त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली आहे. पाणी निर्जुंतुकीकरणासाठी टीसीएल पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध करुन घेण्यात आला आहे. सोहळ्याच्या येथील वास्तव्यादरम्यान 9 रुग्णवाहिका आणि 108 क्रमांकाची 1 रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली असून त्याद्वारे तातडीची वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याच्या जोडीला मोबाईल ओपीडी सुरु ठेवण्यात येणार आहे तसेच पालखी मार्गावरील खाजगी रुग्णालयातील काही कॉट्‌स आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे तरडगाव व बरड येथील प्रा. आरोग्य केंद्र आणि फलटणचे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय सेवा सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी सज्ज ठेवण्यात येत असून त्यासाठी पुरेसा वैद्यकिय अधिकारी कर्मचारी आणि पुरेसा औषधसाठा तेथे उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

दररोज 500 टॅंकर खेपाद्वारे पाणी पुरवठा
पालखी सोहळ्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 27 शासकीय टॅंकर्सद्वारे दररोज 500 टॅंकर खेपांचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर गरजेनुसार खाजगी टॅंकर्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याच्या जोडीला फलटण शहरात नगर परिषदेने जादा स्टॅंण्ड पोस्ट उभारुन पुरेशा पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. सदरचे टॅंकर्स भरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या फिडींग पॉईंटवर 24 तास कर्मचारी आणि वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत टॅंकर भरुन देण्यात अडचण येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालखी तळालगत टॅंकर फिडींग पॉईंट
फलटण नगर परिषद पाणी पुरवठा योजना साठवण तलावालगत सोमवार पेठेत असलेल्या फिडींग पॉईंटमुळे पालखीतळ किंवा शहरात अन्य ठिकाणी असलेल्या दिंडीकऱ्यांना तेथून रिकामे टॅंकर सोमवार पेठेत पाठविणे आणि तेथून भरुन पुन्हा पालखी तळावर आणताना शहरातील गर्दी व वाहतूकीचा प्रचंड त्रास होत असे किंबहुना शहरातील वाहतुकीलाही या टॅंकर्सचा अडथळा होत असल्याचे गतवर्षी अनुभवास आले त्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी भडकमकरनगर येथील पाण्याची उंच टाकी आणि जाधववाडी येथील विंधन विहिरीवर टॅंकर फिडींग पॉईंट उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यामुळे पालखी तळालगत आणि शहरातून न जाता सहजपणे टॅंकर भरुन घेणे शक्‍य होणार असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

सुरक्षिततेसाठी पोलीस दल सज्ज
सातारा जिल्हा पोलीस दलाने सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन केले असून त्यासाठी जादा पोलीस फौजफाटा आणि जोडीला गृहरक्षकदलाची मदतही घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने संपूर्ण पालखी मार्ग आणि जिल्ह्यातील सर्व पालखी तळावर पुरेसा बंदोबस्त नियुक्त करण्यात येत आहे. प्रत्येक पालखी तळावर वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी पेट्रोलिंग व वाहतूक नियोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचे पोलीसदलाच्यावतीने सांगण्यात आले.

पालखी तळावर स्वच्छतेची सर्व व्यवस्था
फलटण नगर परिषदेने फलटण येथील पालखी तळावर (विमानतळ) माऊलींचा तंबु व त्याशेजारच्या मानकऱ्यांच्या तंबूसाठी प्रतिवर्षाप्रमाणे योग्य नियोजन करुन आखणी व अखंडीत वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन झाले पाहिजे यासाठीही योग्य नियोजन करण्यात येत आहे. पालखी तळावर 1 हजार चराची तात्पुरती शौचालये उभारण्यात येत असून त्याच्या जोडीला शासनाच्या माध्यमातून सुमारे 900 तात्पुरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात येत असून तेथे पुरेसा पाणी व वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

एसटी प्रशासनही सज्ज, जोडीला रिक्षा संघटना
एस.टी. महामंडळाच्यावतीने शहराच्या बाहेर कोळकी, मुधोजी महाविद्यालय, गोविंद डेअरी आणि सोमवार पेठ येथे तात्पुरती नियंत्रण शेड उभारण्यात येणार आहे.त्याद्वारे बाहेर गावाहून येणाऱ्या एसटी बसेस तेथेच थांबवून प्रवासी उतरवून व त्या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देवून बस तेथूनच परत आपल्या मार्गाने पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.