फलटण : फलटण शहर माझे घर असून ते स्वच्छ व सुंदर बनविणार असल्याची ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. नगरपालिकेच्या सभागृहात आमदार सचिन कांबळे पाटील यांनी शहरातील विविध विकास कामे आणि वाहतूक समस्येवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
मुख्याधिकारी निखिल मोरे, नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. शहरामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची आवश्यकता असून महिलांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात शहरांत महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेश मुख्याधिकारी निखिल मोरे यांना आ. सचिन पाटील यांनी दिले. शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामासंदर्भात माहिती आ. पाटील यांनी मागितली असता कामे अपूर्ण आणि बंद असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कामासंदर्भात अनेक तक्रारी असल्याने याची श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती जनतेसमोर आणा, अशी सूचना त्यांनी केली. पार्किंगच्या जागेत अनेकांनी अतिक्रमण केले असून वाहने रस्त्यावर येत आहेत. ज्यांनी पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करून गाळे काढले आहेत अशी बेकायदा पार्किंग काढून टाकावीत व यापुढे पार्किंगसाठी जागा सोडली असल्यासच परवानगी द्यावी, असे त्यांनी सांगितले.
विविध खात्यांचा आढावा घेताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्रत्येक खात्यासंदर्भात बारकाईने माहिती घेताली. भुयारी गटारी योजना आहे की मलःनिसारण योजना आहे याचे उत्तर अधिकारी वर्गाला देता आले नाही. अतिक्रमणे व घाणीचे साम्राज्य यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना त्यांनी यासंदर्भात तातडीने कारवाई करावी अशी सूचना केली. मोकळ्या जागा मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर करून घेण्याची मागणी केली. या मोकळ्या जागांवर बाग, इतर सोयीसुविधा आणि मोठे हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याची ग्वाही नाईक निंबाळकर यांनी दिली.
शहरासाठी भूमिगतवी वाहिनी मंजूर झाल्याने आता तारांचा त्रास होणार नाही. उपकेंद्र मंजूर झाल्याने विद्युत पुरवठा सुरळीत राहील. शहरातील नागरिकांनी सत्ता आमच्या हातात दिली तर येत्या दोन वर्षात रस्त्यांचे दर्जेदार काँक्रिटीकरण करणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने संकलित कर सुद्धा कमी करून स्वच्छ व सुंदर शहर बनवणार आहे. शहरासाठी अनेक उद्याने उभी करणार आहे. अशी ग्वाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
डमी कर्मचाऱ्यांना कामावर घ्या…
नगरपालिकेमध्ये 23 कर्मचारी डमी आहेत. परमनंट आहेत ते दुसऱ्याला नेमून कामे करायला लावतात, अशांना कामावरून त्वरित कमी करून काम करणाऱ्या डमी 23 कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात प्रत्येक प्रभागांमध्ये आमदारांसह फिरून तेथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. दहा दिवसात पुन्हा नगरपालिकेची बैठक घेऊन सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहे, से त्यांनी स्पष्ट केले.