अहमदाबाद – देशात इंधनाच्या वाढत्या दराबद्दल सार्वत्रिक ओरड सुरू असताना पेट्रोलियम मंत्र्यांनी मात्र याचे खापर कच्चा तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरांवर फोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर वाढत आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर 70 डॉलर्स प्रतिपिंप झाले आहेत असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
इंधनाचे दर जीएसटीत आणले तर त्यांचे दर कमी होईल त्याबाबतीत काय निर्णय घेणार, असे विचारता ते म्हणाले की, हा निर्णय जीएसटी कौन्सिलने घ्यायचा आहे. असा निर्णय झाला तर इंधनाचे दर कमी होतील त्यामुळे ही संकल्पना आपल्याला मान्य आहे; पण तो निर्णय आमच्या हातात नाही असे त्यांनी म्हटले आहे.
मनमोहन सिंग सरकारच्या काळात कच्चा तेलाचे दर 145 डॉलर्सवर गेले होते त्या तुलनेत आजही कच्चा तेलाचे दर निम्म्याने कमी आहेत तरीही इंधनाचे दर मात्र शंभरी पार करून गेले आहेत असा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेतला जात आहे.
तथापि, त्यावर मात्र केंद्र सरकारकडून कोणतेही भाष्य केले जात नाही. केंद्राने इंधनावर मोठ्या प्रमाणावर उत्पादन शुल्क लागू करून लोकांना कच्चा तेलाच्या किमतीत झालेला लाभ मिळू दिला नाही यावरही सरकारकडून कोणतेही भाष्य केले जात नाही, असाही आक्षेप विरोधी पक्षाकडून घेतला जात आहे.