नवी दिल्ली : एक जूनला लॉकडाऊन उठल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचे दैनंदिन पुनरावलोकन करण्याच्या तयारीत सार्वजनिक कंपन्या आहेत. त्यामुळे पेट्रोल अणि डिझेलच्या किंमती चार ते पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींच बिैठक गेल्या आठवड्यात झाली. त्यात लॉकडाऊननंतर दैनंदिन दर ठरवण्याच्या उपाय योजनेबाबत विचारविनिमय करण्यात आला. एवढेच नव्हे तर लॉकडाऊन पाचव्या टप्प्यात सुरू राहिला तरी ही उपाय योजना करण्याबाबत एकमत झाले. जागतिक बाजारभावापेक्षा कमी किंमतीत होणारी पेट्रोल विक्री करून होणारा संचित तोटा वाढवण्या पेक्षा सरकार दैनंदिन किंमत निर्धारणाला मान्यता देण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत इंधनाच्या किंमती 50 टक्के सावरल्या आहेत. सध्या त्या 30 डॉलर्स प्रतीबॅरेलच्या असपास आहेत. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जगभरातील देशांनी टाळेबंदी लागू केल्याने तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या. मात्र त्या वाढल्यानंतर सध्या खरेदी आणि विक्रीच्या दरात मुळात चार ते पाच रुपयांचा फरक पडत आहे. त्यामुळे निर्माण झालेला तोटा भरून काढण्यासाठी प्रतिदिन 40 ते 50 पैशांनी किमंती वाढवली जाण्याची शक्यात या कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. इंधन तेलाच्या किंमतीत किती वाढ करायची हे तेलाच्या जागतिक किंमती आणि विक्रीची किंमत यावर ठरवले जाणार आहे.