पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज इतर कोणत्याही वाहन चालकांना इंधन देण्यास सरकारने मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचा भंग करून सर्व वाहन चालकांना इंधन देणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारी घडली.
धर्मेंद्र हिडनारायण दुबे (रा. दुबे बिल्डींग, कामगार नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक कुणाल दिलीप शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 27) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज इतर कोणत्याही वाहनांना इंधन देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे.
मात्र या मनाई आदेशाचा भंग करून धर्मेंद्र दुबे याने आपला हिंजवडी माण रस्त्यावरील गायत्री पेट्रोल पंप दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सुरू ठेवला. यामुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला. यामुळे दुबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.