पेट्रोल 2.45 रूपयांनी तर डिझेल 2.36 रूपयांनी महागले

केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्याच्या पुढच्याच दिवशी सामान्यांना इंधन दरवाढीचा चटका

नवी दिल्ली  -केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्याच्या पुढच्याच दिवशी जनसामान्यांना इंधन दरवाढीचा चटका बसला. अर्थसंकल्प सादर करताना शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधनांवरील करांमध्ये वाढीचा प्रस्ताव ठेवला. त्यापाठोपाठ शनिवारी देशाची राजधानी दिल्लीत लिटरमागे पेट्रोल 2 रूपये 45 पैशांनी तर डिझेल 2 रूपये 36 पैशांनी महागले.

सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क तसेच रस्ते आणि पायाभूत सुविधा अधिभारात मिळून प्रत्येकी 2 रूपयांची वाढ केली. मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात तब्बल दहा वेळा वाढ करण्यात आली. त्या कालावधीत उत्पादन शुल्कात केवळ दोनवेळा कपात करण्यात आली. आता पेट्रोलवर 19 रूपये 98 पैसे तर डिझेलवर 15 रूपये 83 पैसे इतके उत्पादन शुल्क आकारले जाईल. दरम्यान, मुंबईत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 2 रूपये 42 पैसे आणि 2 रूपये 50 पैशांनी महागले आहे. पेट्रोल दिल्लीत 72.96 रूपये तर मुंबईत 78.57 रूपयांवर पोहचले आहे. तेथील डिझेलचा दर अनुक्रमे 66.69 रूपये आणि 69.60 रूपये इतका झाला आहे.

मध्यप्रदेश, राजस्थानातील जनतेला मोठा दणका
मध्यप्रदेश आणि राजस्थान या कॉंग्रेसशासित राज्यांमधील जनतेला आणखीच मोठा दणका बसला आहे. दोन्ही राज्यांच्या सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर लादला. त्यामुळे ती इंधने मध्यप्रदेशात 4 रूपये 50 पैशांनी तर राजस्थानात 5 रूपयांनी महागली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.