निवडणुकीच्या हंगामातही पेट्रोलची दरवाढ सुरूच

डिझेलच्या दरामध्येही 4 रुपयांची वाढ

पेट्रोलचे दर वाढत असताना डिझेलच्या दरामध्येही मागील तीन महिन्यांत सातत्याने वाढ झालेली आहे. जानेवारी महिन्यात दि. 10 जानेवारी रोजी डिझेलच्या दर सर्वात कमी 64.35 रुपये प्रतिलिटर होता. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 4 रुपये 4 पैशांची दरवाढ झाली आहे. आज दि. 22 एप्रिल रोजी शहरात डिझेल 68. 39 रुपये प्रतिलिटरने मिळत आहे.

पिंपरी – सध्या देशात आणि राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या धामधुमीत सर्वसामान्य नागरिकांवर सर्वच पक्षांकडून अश्‍वासनाचा भडीमार सुरू आहे. मात्र, सर्वसामान्यांची महागाईमुळे सुरू असलेली होरपळ काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. मागील वर्षात नव्वदीपार केलेल्या पेट्रोलचे दर ऐन निवडणुकीच्या तोंडावर घसरले होते. मात्र, सध्या निवडणुकीची धामधूम सुरु असताना पेट्रोलची दरवाढ कायम आहे. मागील तीन महिन्यांत साडेतीन रुपयांनी पेट्रोलचे भाव वाढले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधीपक्षांनी पेट्रोल आणि डझेलच्या वाढत्या किमतींवर सरकारला धारेवर धरले होते व महागाईचा मुद्दाच प्रचारात मुख्य अस्त्र म्हणून वापरला होता. मात्र, यावेळच्या निवडणुकीत सध्याचे सरकार आणि विरोधी पक्षांनीही महागाईच्या मुद्दयापासून फारकत घेतलेली दिसून येत आहे. अशा स्थितीत जिवनावश्‍यक वस्तूंचे दर रोजच वाढत चालले आहेत. सातत्याने होणारी दरवाढ ही सर्वसामन्य नागरिकांची मात्र डोकेदुखी ठरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी पेट्रोल, डिझेलची दरवाढ सातत्याने होत होती. या दरवाढीच्या विरोधात अनेक ठिकाणी लहान मोठी आंदोलनेही झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर हा मुद्दा काहीसा बाजुला पडला. जानेवारी महिन्यात पेट्रोलच्या दरामध्ये घसरण झाली होती.

6 जानेवारी रोजी पेट्रोलचा दर 74.03 रुपये प्रतिलिटर होता. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पेट्रोलचा दर थेट 75.92 म्हणजेच 76 रुपयांवर जाऊन पोहचला. त्यानंतर मार्च महिन्यापासून पेट्रोलची दरवाढ सुरुच राहिली. 1 एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड शहरात पेट्रोलचा दर 78.34 रुपये होता. त्यांनतर 22 दिवसांमध्ये या दरामध्ये वाढ होत दि. 22 एप्रिल रोजी 78.43 रुपये झाला आहे. मागील तीन महिन्यात सातत्याने पेट्रोलच्या दरामध्ये वाढ होत आहे. किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत नसली तरी दररोज काही पैशामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना फारशी तफावत जाणवत नसली तरी नकळत सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचत आहे. जानेवारी ते एप्रिल मधील पेट्रोलच्या दरामधील तफावत पाहिली असता, पेट्रोलच्या दरामध्ये साडेचार ते पावणेपाच रुपये प्रतिलिटर वाढ झाल्याची बाब समोर आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.