नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी मंगळवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 27 पैशांची, तर डिझेलच्या दरात 29 पैशांची वाढ केली. त्यामुळे मुंबईत पेट्रोल दराने 99 रुपयांचा टप्पा ओलांडला.
काही दिवस थांबलेले इंधन दरवाढीचे सत्र चालू महिन्यात पुन्हा सुरू झाले. त्यातून 4 मेपासून दहाव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली. त्यामुळे चालू महिन्यात पेट्रोल 2 रुपये 46 पैशांनी, तर डिझेल 2 रुपये 78 पैशांनी महागले आहे.
वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोलने याआधीच महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांत 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही पेट्रोल शंभरीच्या दिशेने निघाले आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 99 रुपये 14 पैसे, तर डिझेलचा दर 90 रुपये 71 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत पेट्रोल 92 रुपये 85 पैशांवर, तर डिझेल 83 रुपये 51 पैशांवर पोहोचले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांच्या दरांवर भारतातील दर अवलंबून आहेत. त्यातून कच्चे इंधन महागल्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर 15 मार्चनंतर प्रथमच प्रतिपिंप 70 डॉलर्सवर पोहोचले आहेत.