नवी दिल्ली – भारतामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. जागतिक पातळीवर आकडेवारीचा आढावा घेतला असता भारतातील पेट्रोलचे दर अमेरिका, ब्राझील, जपान, रशिया, चीन, पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षा कमी आहेत. मात्र भारतातील पेट्रोलचे दर हे ब्रिटन आणि जर्मनी, हॉंग कॉंगपेक्षा कमी आहेत असे दिसून आले आहे.
भारताबरोबरच जगातील प्रत्येक देशामध्ये सध्या इंधनाच्या दरावरून उलट-सुलट चर्चा चालू आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर 85 डॉलरवरून 110 डॉलर वर गेले आहेत. त्याचबरोबर अमेरिका वगळता इतर देशांना महाग डॉलरमुळे कच्च्या तेलाची आयात आणखी महागात पडते. त्यामुळे इंधनाचे दर कोणत्या पातळीवर ठेवावेत याबाबत निर्णय घेणे अनेक देशांना अवघड झाले आहे.
बॅंक ऑफ बडोदाने भारत आणि इतर देशातील इंधनाच्या दराचा तुलनात्मक आढावा घेऊन अहवाल तयार केला आहे. यासाठी 106 देशातील पेट्रोलच्या किमतीचा आढावा घेण्यात आला असून भारतामध्ये सध्या पेट्रोलचे दर 1.35 डॉलर प्रति लिटर आहेत. भारत जागतिक पातळीवर इंधन दरवाढीत 42 व्या क्रमांकावर आहे.
भारतातील पेट्रोलचे दर ऑस्ट्रेलिया, तुर्कस्तान आणि दक्षिण कोरियातील दराशी साधर्म्य ठेवून आहेत. मात्र डॉलरमध्ये जरी भारतातील इंधनाचे दर इतर बऱ्याच देशांपेक्षा कमी असले तरी भारतातील दरडोई उत्पन्न पाहता भारतातील जनतेला महाग पेट्रोलचा जास्त त्रास होतो.
भारतापेक्षा दरडोई उत्पन्न जास्त असलेल्या अनेक देशात पेट्रोलचे दर भारतापेक्षा जास्त असले तरी तेथील नागरिकांना त्याचा फारसा त्रास होत नाही. सध्याच्या पेट्रोल दरवाढीचा भारतातील गरीब आणि मध्यम वर्गावर जास्त परिणाम झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची आवश्यकता दिसून येते असे अहवालात म्हटले आहे. जगामध्ये सर्वात महाग पेट्रोल हॉंगकॉंग मध्ये असून तेथे पेट्रोलचा दर 2.58 डॉलर प्रति लिटर आहे. तर जगात सर्वात स्वस्त पेट्रोल मलेशियात असून तेथे केवळ अर्ध्या डॉलरला एक लिटर पेट्रोल मिळते.