नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे 35 आणि 15 पैशांची वाढ केली. त्यामुळे चालू वर्षातील मेपासून पेट्रोलच्या दरात 40 वी, तर डिझेलच्या दरात 37 वी वाढ नोंदली गेली.
सार्वजनिक कंपन्यांनी 18 दिवसांच्या खंडानंतर 4 मे यादिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली. तेव्हापासून इंधन दरवाढीचे सत्र सुरू झाले आहे. मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 11.14 रूपयांची, तर डिझेलच्या दरात 9.14 रूपयांची वाढ झाली. मागील वर्षाच्या मेपासून आतापर्यंत पेट्रोल जवळपास 32 रूपयांनी, तर डिझेल 27.58 रूपयांनी महागले आहे.
इंधन दरवाढीच्या सत्रामुळे देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोलचा दर याआधीच 100 रूपयांवर गेला आहे. राजस्थान, ओडिशा आणि मध्यप्रदेश या 3 राज्यांत तर डिझेल दरानेही शंभरी ओलांडली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधक मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. तो मुद्दा पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.