पेट्रोल, डिझेल टॅंकर कुंजीरवाडीत जळाला

9 हजार लिटर डिझेल, 10 हजार लिटर पेट्रोलसह टॅंकरचे नुकसान

पुणे – पेट्रोल, डिझेल वाहतूक करणाऱ्या “हेवी ड्युटी’ टॅंकरला आग लागली. ही घटना कुंजीरवाडी हद्दीतील थेऊर फाट्याजवळ मंगळवारी (दि.2) रात्री अकराच्या सुमारास घडली. यात 9 हजार लिटर डिझेल, 10 हजार लिटर पेट्रोलसह टॅंकरचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा टॅंकर 20 हजार लिटर क्षमतेचा होता.

संबंधित टॅंकर क्र. एमएच 12 एमएक्‍स 7116 हा श्रीकांत राजेंद्र सुंबे यांच्या मालकीचा असून, कदमवाकवस्ती हद्दीत हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीमध्ये पेट्रोल, डिझेलची वाहतूक करतो. मंगळवारी टॅंकर महाबळेश्‍वर येथील इराणी पेट्रोलपंप येथे जाणार होता. परंतु घाट रस्ता व रात्रीच्या प्रवासामुळे टॅंकरमालक सुंबे यांचे थेऊरफाटा येथील पार्किंगमध्ये आठ वाजण्याच्या सुमारास लावण्यात आला होता.

मंगळवारी रात्री टॅंकरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस यांच्यासह पीएमआरडीए अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील, लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.