नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. त्यामुळे ती इंधने सलग पाचव्या दिवशी महागली.
ताज्या दरवाढीमुळे पेट्रोल दिल्लीत 107.59 रुपयांवर, तर मुंबईत 113.46 रुपयांवर पोहचले आहे. डीझेलचा दर दिल्लीत 96.32 रुपये, तर मुंबईत 104.38 रुपये इतका झाला आहे. सार्वजनिक कंपन्यांनी इंधन दरबदलाला तीन आठवड्यांचा विश्राम दिला.
त्यानंतर मागील महिन्याच्या (सप्टेंबर) अखेरच्या आठवड्यापासून पुन्हा इंधन दरवाढीचे सत्र सुरू झाले. डीझेल दरात 24 सप्टेंबरपासून तब्बल 24 वेळा वाढ झाली. त्यामुळे महिनाभरात ते इंधन 7 रुपये 70 पैशांनी महागले. पेट्रोल दरात 28 सप्टेंबरपासून 21 वेळा वाढ झाली. त्या वाढींमध्ये मिळून पेट्रोल 6 रुपये 40 पैशांनी महागले.
मागील वर्षाच्या मध्यापासून इंधन दरवाढीच्या सत्राला प्रारंभ झाला. त्यामुळे देशातील बहुतांश प्रमुख शहरांत पेट्रोल दराने याआधीच 100 रुपयांची पातळी ओलांडली आहे. तर, दीडडझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत डीझेल दरानेही शंभरी पार केली आहे.
……..