नवी दिल्ली – जागतिक बाजारात क्रुडचे दर वाढत असल्याचे भासवून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बेसुमार वाढ चालू केली आहे. प्रत्यक्षामध्ये भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर इतक्या उच्चपातळीवर आहेत की त्यामध्ये आणि क्रुडच्या दरामध्ये बरीच विसंगती असल्याचे दिसून येते. देशात आज पेट्रोलची किंमत शतरच्या पार गेली आहे. दुसरीकडे, शेजारील देश पाकिस्तानात अर्ध्या किंमतीत म्हणजेच ५१.१४ रुपयांनी तर चीनमध्ये ७४.४ रुपये लिटर आहे
भारतीय रुपयानुसार, जगात पेट्रोलच्या प्रति लीटर सरासरी किंमत ७८.६५ रुपये आहे. भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल अरुणाचल प्रदेशमध्ये मिळत असून ८३.१९ प्रतिलिटर आहे. दिल्लीत याची किंमत ८९.५४ आहे.
दरम्यान, भारतामध्ये पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले असतानाच दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशामध्ये पेट्रोलचे भाव अत्यल्प आहेत. येथे पेट्रोलचा दर प्रति लिटर (भारतीय चलनानुसार) १ रुपया ४५ पैसे इतका आहे.
दरम्यान, मुळात नरेंद्र मोदी सरकारने जीएसटीच्या कक्षेत नसलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. हे शुल्क कमी केल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार नाहीत. मात्र अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात तरी केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात होण्याची शक्यता मावळली आहे.
क्रुड आणि पेट्रोलचा दर
एक पिंप क्रुडचा दर सध्या 60 डॉलर म्हणजे 4,500 रुपये आहे. एका पिंपातून 159 लिटर पेट्रोल मिळते. या हिशेबाने एक लिटर पेट्रोलचा दर 28 रुपये पडतो. मात्र भारतात हा दर 93 रुपये आहे.