मुंबई – सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आग लागली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज 80, 85, 75 पैशांनी वाढ होत आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठ रुपयांनी वाढ झाली आहे.
जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं बिरुद असलेल्या परभणी जिल्ह्यात देशातील सर्वात महाग पेट्रोल मिळत आहे. येथे सामान्य पेट्रोलची किंमत 121.38 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर आहे.
तसेच राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात उच्च असून येथे पेट्रोलचा दर 120.73 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 103.30 रुपये प्रति लिटर आहे. मात्र देशातील सर्वात महाग पेट्रोल आज तरी परभणीतच मिळत आहे.
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकण्याचं प्रमुख कारण म्हणजे, परभणीपासून ३४० किमी अंतरावर असलेल्या मनमाड डेपोतून परभणीला तेलाचा पुरवठा होतो. परभणी पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भेडसूरकर म्हणाले की, औरंगाबादला डेपो सुरू करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे तेलाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी घट होऊ शकते.
ते पुढे म्हणाले की, तेलाच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणल्यास लोकांना जास्तीत जास्त दिलासा मिळेल. स्थानिक कराव्यतिरिक्त इंधनाचे दरही मालवाहतुकीवर अवलंबून असतात.