नवी दिल्ली – मे महिनाअखेरच्या दिवशीही लिटरमागे पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 29 आणि 26 पैशांनी महागले. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरांमधील ती एका महिन्यातील तब्बल 16 वी वाढ ठरली.
सार्वजनिक इंधन कंपन्यांनी 18 दिवसांच्या खंडानंतर 4 मे या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केली. त्यानंतर महिनाभर दरवाढीचे सत्र चालू राहिले. त्यामुळे एकट्या मे महिन्यात लिटरमागे पेट्रोल 3 रुपये 83 पैशांनी, तर डिझेल 4 रुपये 42 पैशांनी महागले.
दरवाढीच्या सत्रामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांत पेट्रोलच्या दराने याआधीच शंभरीचा टप्पा पार केला आहे.
राजस्थानात डिझेल दरानेही (98.08 रुपये) शंभरी गाठण्याच्या दिशेने कूच सुरू केली आहे. त्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 105 रुपये 24 पैसे इतका आहे.
दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 94.23 रुपये आणि 85.15 रुपये आहेत. मुंबईत याआधीच शंभरी ओलांडणारा पेट्रोल दर 100 रुपये 47 पैशांवर पोहोचला आहे. त्या शहरात डिझेलचा दर 92.45 रुपये इतका आहे.