नवी दिल्ली -पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे सत्र मंगळवारी सलग 10 व्या दिवशी सुरू राहिले. नव्या दरवाढीमुळे त्या इंधनांच्या किमतीत अनुक्रमे 47 पैशांची आणि 93 पैशांची भर पडली. आता अवघ्या 10 दिवसांत लिटरमागे पेट्रोल 5 रुपये 47 पैशांनी तर डिझेल 5 रुपये 80 पैशांनी महागले आहे.
दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करण्याची प्रक्रिया तब्बल 82 दिवस स्थगित होती. ती प्रक्रिया सार्वजनिक इंधन कंपन्यांनी 7 जूनपासून सुरू केली. तेव्हापासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. इंधनांच्या किमती दररोज बदलण्याची प्रक्रिया सर्वप्रथम मे 2017 मध्ये हाती घेण्यात आली. तेव्हापासून डिझेलची 93 पैसे दरवाढ उच्चांकी ठरली आहे. सध्याची दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे. मात्र, स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) भिन्न आकारणीमुळे राज्याराज्यांत इंधन दर वेगवेगळे आहेत.
दरम्यान, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) म्हणजेच विमान इंधनही 16.30 टक्क्यांनी महागले. विमान इंधनाचा दर प्रति किलो लिटर 5 हजार 494 रुपयांनी वाढला. त्यामुळे दिल्लीत विमान इंधनाचा दर आता किलो लिटरमागे 39 हजार रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. चालू महिन्यात दुसऱ्यांदा विमान इंधन महागले आहे. याआधी 1 जूनला त्या इंधनाच्या दरात विक्रमी 56.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी ती दरवाढ किलो लिटरमागे 12 हजार 126 रुपये इतकी होती. विमान इंधनाच्या किमतीचा आढावा दर पंधरवड्याने घेतला जातो. त्यानुसार, त्या इंधनाची किंमत बदलते किंवा जैसे थे राहते.