नवी दिल्ली: सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शुक्रवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 56 पैशांची, तर डिझेलच्या दरात 63 पैशांची वाढ केली. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये सलग 13 दिवस वाढ झाली. त्या कालावधीत मिळून पेट्रोल 7 रूपये 11 पैशांनी, तर डिझेल 7 रूपये 67 पैशांनी महागले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज बदल करण्याच्या धोरणाला सार्वजनिक कंपन्यांनी 82 दिवस स्थगिती दिली. त्यानंतर 7 जूनपासून त्या इंधनांच्या किमतीचा दरदिवशी आढावा घेण्याचे धोरण पुन्हा अवलंबण्यात आले. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेल महागण्याचे सत्र कायम आहे.
दोन्ही इंधनांची दरवाढ देशभरासाठी लागू आहे. मात्र, प्रत्येक राज्यात त्या इंधनांवर लावण्यात आलेल्या स्थानिक विक्री कराचा किंवा मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर वेगवेगळा आहे. त्यामुळे राज्याराज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न आहेत.