जावळीतील अवैध व्यवसायांच्या विरोधात याचिका करणार

सातारा – जावळी तालुक्‍यातील बेकायदेशीर दारू व्यवसायांविरोधात निवेदन देऊनही पोलीस कारवाई करत नाही. अवैध व्यवसायांवर “मोक्‍का’ अंतर्गत कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे शिवसेनेच्या जावळी तालुका महिला संघटक सौ. जयश्री पवार यांनी सांगितले.

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुख्यमंत्री व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यालयास निवेदने दिली आहेत. मात्र, ठोस कारवाई झाली नाही. तालुक्‍यात दारूबंदी असतानाही राजरोस दारू विक्री सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना येथील दारू विक्रेत्यांचे व्हिडिओ अनेक वेळा पाठवले तरी ते थातुरमातूर कारवाई करतात. मेढा, कुडाळ, सोमर्डी, शेते, करहर, सरताळे, हुमगाव, महिगाव, सायगाव, आनेवाडी परिसरात दारू विक्री सुरू आहे. तालुक्‍यातील अवैध धंदे हद्दपार करावेत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा वासंती पाडळे, वनिता परमाणे, सुनंदा भिलारे, सीमा दुर्गावळे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.