पनवेल – पनवेल महापालिकेत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीवर पालिका प्रशासनाला नियंत्रण ठेवण्यात आले नसून उपाययोजना राबविण्यात अपयश येत असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी दाखल केली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरुवारपर्यंत (11 जून) एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 861 वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांतही येथे नव्या 44 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र असे असतानादेखील पालिका प्रशासनाने आतापर्यंत कुठलीही आरोग्य तपासणी केलेली नाही.
करोनाच्या या महाभयंकर काळातही पालिका प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप नावडे प्रभागातील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. करोना काळात आपण किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या सूचनांकडे मनपा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक म्हात्रे यांच्या नावडे प्रभागात नियमित करोनाबाधित आढळत आहेत. यामुळे येथील करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे.करोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तर सोडाच, प्रशासनाने मी केलेल्या पत्रव्यवहार आणि इमेलचेही उत्तर देण्यास असमर्थ ठरली असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.