पेठ -येथील परिसरात पाहिले दाम्पत्य करोनाबाधित असताना मंगळवारी (दि. 2) एकाच कुटुंबातील चार जण करोनाबाधित आढळल्याने पेठ व सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात चिंतेची बाब निर्माण झाली आहे. यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश असून ते मुंबईहून आलेले आहेत, त्यामुळे पेठ गावातील बाधितांची संख्या 6वर पोहचली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
पेठ गाव 29 मे ते 12 जून दरम्यान 14 दिवस पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. त्यातच मंगळवारी चार बाधित सापडल्याने गावात विशेष दक्षता घेऊन सर्व वाड्यावस्त्यांवर खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले. या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे, तलाठी हेमंत भागवत, पोलीस कैलास कड यांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना होमक्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती उपसरपंच अनिल सणस, संतोष धुमाळ, अशोक राक्षे यांनी दिली.
गावात पोलिसांची जादा कुमक नेमण्यात आली असून, 14 दिवस कोणत्याही व्यक्तीला बाहेर फिरता येणार नाही. बॅंका, पोष्ट, दुकाने, शाळा आदी सर्व बंद ठेवण्यात आले आहेत. तर दररोज कुटुंब सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा शिक्षक आणि आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
गावातील अनेक व्यक्ती या करोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्याने सर्वांना शासकीय आश्रम शाळेत किंवा इतरत्र क्वारंटाइन केले जाणार आहे.
– डॉ. सुरेश ढोकळे, वैद्यकीय अधिकारी, आंबेगाव तालुका