बावड्यात ऐन दुष्काळात पेरू बहरला

देशपांडे बंधूंकडून कमी पाण्यात जोमदार पीक

– एम. एस. सुतार

बावडा – इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी नेहमीच प्रयोगशील शेतीला प्राधान्य देतात. याचाच प्रत्यय बावडा येथील प्रयोगशील शेतकरी देशपांडे बंधूंनी दाखवून दिला आहे. देशपांडे बंधूंनी ऐन दुष्काळात पाणी उपलब्ध नसतानाही एक एकर पेरूची बाग जोपासली आहे.

बावडा (ता. इंदापूर) येथील हरिश्‍चंद्र अरविंद देशपांडे व नितीन अरविंद देशपांडे या बंधूंनी व्यवसाय व नोकरी सांभाळत एक एकरामध्ये जवळपास दोनशे पेरुची लागवड केली. यातून सव्वा लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

पेरू बागेविषयी माहिती देताना देशपांडे बंधू म्हणाले की, ऍग्रीकल्चर कॉलेज पुणे येथून लखनौ सरदार जातीची रोपे आणली. लागवडीनंतर आमच्यासमोर सर्वांत मोठा यक्ष प्रश्‍न होता तो पाण्याचा. लागवडीनंतर दुष्काळी परिस्थितीमुळे विहिर कोरडी पडली होती. विंधन विहिरही उचक्‍या देऊ लागली. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रश्‍न आवासून उभा राहिला. लागवडीदरम्यान धाडस करून जवळजवळ चाळीस हजार रुपये खर्च केला. परंतु आम्ही दोन्ही भावडांनी हार मानली नाही. विंधन विहिरीतून मिळणारे पाणी ठिबकद्वारे काटकसरीने नियोजनबद्धरित्या पुरवले. आज ही बाग प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगलीच बहरली आहे. फळांनी झाडे लगडली आहेत. प्रती झाड 15 ते 20 किलो फळ मिळू शकेल. प्रती किलो तीस ते चाळीस रुपये भाव मिळेल, अशी अपेक्षा देशपांडे बंधूंनी व्यक्‍त केली.

प्रतिवर्षी सव्वालाख हमखास उत्पन्न – देशपांडे बंधू
आम्ही प्रायोगिक तत्त्वावर सध्या एक एकर क्षेत्रामध्ये दोनशे पेरूंच्या झाडांची लागवड केली आहे. या लागवडीसाठी आम्हाला चाळीस हजार रुपये खर्च आला आहे. या झाडांपासून आपण 30 ते 35 वर्षे उत्पादन घेऊ शकतो. झाडांचे प्रतिवर्षी एक लाख ते सव्वा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हमखास मिळू शकते. शिवाय आंतरपीक घेता येते. त्यामुळे कमी पाण्यातही आमचे उत्पादन व उत्पन्न नक्‍कीच वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन देशपांडे बंधूंनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)