पुणे – शहरातील पाचही करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले सुमारे 43 जणांचा प्रशासनाकडून मागमूस काढण्यात येत आहे. या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही या आजाराची शक्यता झाली असल्याने नाकारण्यात येत नाही. मात्र, या व्यक्तींना पहिल्या दिवशी आरोग्य यंत्रणेने संपर्क साधून पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात तपासणीसाठी बोलविले होते. मात्र, अनेक जणांची आपले मोबाइलच बंद केले आहेत. त्यामुळे या नागरिकांना शोधण्यासाठी आता पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. या नागरिकांचे पत्ते प्रशासनास मिळाले असून त्यांना पुन्हा संपर्क करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
आजाराला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच राज्य शासनाचा आरोग्य विभाग संयुक्त मोहीम राबवित आहे. त्यांतर्गत लागण झालेल्या पाचही रुग्णांकडे ते भारतात आल्यानंतर कोणाच्या संपर्कात आले याची माहिती घेऊन संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी बोलविले जात आहे. मात्र, नायडू हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्यालाही आजार होईल अथवा इतर भीतीपोटी घाबरलेल्या व्यक्तींनी आपले मोबाइल फोनच बंद केले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत आरोग्य विभागाने या पाच व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तसेच डॉ. नायडू रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे 36 जणांच्या घशातील द्रवाचे नमूने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही)मध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या साथीची तीव्रता समोर येणार आहे.
आजारी असतानाही रुग्णाचा योग शिबिरात सहभाग
आजाराची लागण झालेला एक रूग्ण महिला दिनानिमित्त आयोजित एका योग शिबिरात सहभागी झाला होता. या रुग्णाला दुबईहून आला असल्याने 14 दिवस घरातच थांबण्याच्या तसेच गर्दीत न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आपल्याला असलेली लक्षणे ही व्हायरल फिवरची असल्याचे सांगत हा रूग्ण या शिबिरात सहभागी झाला. त्यामुळे शिबिरात सहभागी झालेले नागरिक शोधायचे कसे असा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे.
बनावट परिपत्रक काढून महाविद्यालयांना दिली सुट्टी
करोना विषाणूचा प्रसार होत असल्याने काही शाळांनी रविवारपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तर, पुणे विद्यापीठाने यापूर्वीच महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकललेले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून, त्यासाठी 20 ते 30 मार्चदरम्यान पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत, सर्वांनी याची नोंद द्यावी असा मजकूर असेलेले परिपत्रक आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे यांच्या स्वाक्षरीसह सोशल मीडियवर व्हायरल झाले.
दरम्यान, त्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने हे परिपत्रक बनावट असल्याचे स्पष्ट करत अशी कोणत्याही प्रकारची सुट्टी जाहीर केली नसल्याचे सांगितले. यासंदर्भात कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यापीठाने कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नाही. याविरोधात विद्यापीठाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. विजय खरे यांनी विद्यापीठाचा शिक्का व स्वाक्षरी बेकादेशीरपणे वापरून सुट्टी जाहीर कली असून, आंतरराष्ट्रीय केंद्राकडून असे कोणतेही परिपत्रक काढलेले नसल्याचे नमूद केले.
मास्क, सॅनिटायझरची जादा दराने विक्री
सॅनिटायझर, मास्कसह सर्दी, ताप, खोकल्याची औषधे घेण्यासाठी मेडिकलमध्ये गर्दी होत आहे. सुरवातीला व्यावसायिकांकडून याची नियमित विक्री होत होती, मात्र करोनाचा पुण्यात रूग्ण सापडला, अशी माहिती सोशल मीडियावर पसरताच सॅनिटायझर आणि डेटॉलला मागणी वाढली आहे. मेडिकल व्यावसायिकांनी त्याचाच फायदा घेत उपलब्ध असलेला साठा जादा किंमतीने देण्यास सुरुवात केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त यांच्याशी चर्चा करून अशा व्यावसायिकांवर लक्ष ठेवून कारवाईच्या सूचना दिल्या.