व्यक्‍तिमत्त्व – खरी वटपौर्णिमा

सागर ननावरे

आज वटपौर्णिमा. चालू ज्येष्ठ महिन्यात येणारा आजचा पौर्णिमेचा दिवस हा “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. सावित्रीने आपल्या पातिव्रत्याने पती सत्यवानाला यमाच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणले म्हणून हा दिवस साजरा केला जातो, अशी प्राचीन आख्यायिका आहे. आदर्श पतिव्रता म्हणून आजही सावित्रीच्या गोष्टी आवर्जून सांगितल्या जातात.

वडाच्या झाडाचे आयुष्य मोठे असते, तसेच त्याच्या शाखांचा, पारंब्यांचा विस्तारही मोठा असतो. वडाच्या झाडाप्रमाणे पतीला दीर्घायुष्य लाभावे व त्या पारंब्यांप्रमाणे आनंदाचा विस्तार व्हावा हा या सणामागचा उद्देश. फार पूर्वीपासून हा दिवस स्त्रियांच्या सौख्याचा आणि सौभाग्याचा दिवस म्हणून आनंदाने साजरा केला जातो.

या दिवशी सुवासिनी पारंपरिक साडीचा पेहराव करतात. त्यातही नऊवारी साडी, आभूषणांनी सजतात. आणि वडाच्या झाडाला धाग्याने गुंडाळून सात फेऱ्या मारतात. आणि पुढचे सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात.
परंतु बदलत्या काळाप्रमाणे या उत्सवाचे स्वरूपही बदलू लागले आहे. अनेकदा केवळ औपचारिकता म्हणून या परंपरा पाळल्या जातात. खरे प्रेम व्यक्त करण्याचा औपचारिक दिखावा म्हणूनही हे सारे केले जाते. या सर्व गोष्टींना कारणीभूत असणारी महत्त्वाची बाब म्हणजेच नात्यांतील हरवत चाललेला सुसंवाद.

सात फेऱ्यांनी सात जन्मांसाठी बांधलेल्या रेशीमगाठी जेव्हा कमकुवत होऊ लागतात, तेव्हा एकमेकांसोबतचे तासही डोईभार वाटू लागतात. ताणतणाव, संशय, वाढत्या अपेक्षा, तुलना, मतभिन्नता यांसारख्या अनेक गोष्टी नात्यांना मारक ठरत असतात. दोन भिन्न स्वभावाच्या भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्तींत मतभिन्नता आढळून येत असते. त्यातही स्वभावात बदल न घडून आल्यास वैवाहिक संघर्षांला सुरुवात होत असते. यातूनच पुढे घटस्फोटासारख्या निर्णयापर्यंत मजल जात असते.

अलीकडे वाढते वैवाहिक संघर्ष आणि घटस्फोटांचे वाढते प्रमाण नक्कीच चिंतेचे आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमेचा सणही पूर्वीसारखा उत्साहात साजरा होताना दिसत नाही. यंदाच्या वटपौर्णिमेला आपल्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून जन्मोजन्मासाठी साथ मागितली जाते. त्याचप्रमाणे पती-पत्नीने महत्त्वाच्या गोष्टी आचरणात आणून जन्मोजन्मांचे हे ऋणानुबंध अधिकच घट्ट करायचे आहेत.

विश्‍वास हवा : विश्‍वास हा कोणत्याही नात्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरत असतो. जोडीदाराच्या मनात विश्‍वासाची भावना निर्माण करता आली पाहिजे. जोडीदाराला अंधारात ठेवणे, फसविणे तसेच असुरक्षिततेची भावना नात्यांना तडे देत असते. म्हणून विश्‍वास जपता आला पाहिजे.

आदर हवा : नात्यांत एकमेकांप्रती कमालीचा आदर असायला हवा. जोडीदाराचे मत, मनोगत आणि सल्ला याबाबत विचार करायला हवा. दुय्यम वागणूक देणे किंवा जोडीदाराच्या मताचा अनादर करणे हे नातेसंबंधांत योग्य नाही. प्रत्येकाने परस्परांच्या भावनांचा, मनाचा आणि संवादाचा आदर करायला हवा. आदरानेच नात्यांना खरा अर्थ प्राप्त होत असतो.
सहजता हवी : पतिपत्नीचे नाते हे कोणत्याही तत्त्व-नियमांच्या बंधनात अडकलेले नसावे. त्यात्‌ औपचारिकता नसावी. नाते हे सहज असावे. एकमेकांच्या चुका समंजसपणे स्वीकारायला हव्यात. आपणही चुकू शकतो, त्यावेळी आपल्यालाही समोरची व्यक्ती समजून घेऊ शकते हे लक्षात ठेवायला हवे. एकमेकांना कठीण प्रसंगात सावरता यायला हवे. नात्यातील सहजता नात्यांना अधिकाधिक घट्ट करीत असते.

जिव्हाळा हवा : नातं कोणतेही असो त्यात जिव्हाळ्याची व आपुलकीची भावना असायला हवी. प्रेम, काळजी, ममता या गोष्टी जोडीदाराच्या मनात आपल्याबद्दल विश्‍वासाची भावना निर्माण करीत असतात. कुणीतरी आपल्यावर मनापासून प्रेम करते ही भावना नात्यांत गोडवा आणत असते.

तडजोड हवी : संसार करीत असताना आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. अशावेळी दोघांना किंवा दोघांपैकी एकाला तडजोड करावी लागत असते. ही तडजोड करताना इगो, ईर्ष्या, तत्वे आणि संशय या गोष्टी आड येता कामा नये. एकविचाराने, एकदिलाने तडजोड करता आली पाहिजे. वेळप्रसंगी तडजोड करताना दोघांच्या हितासाठी माघारही घेता आली पाहिजे.

नात्यात सुसंवाद हवा : आजकाल मोबाइल हाती आल्यामुळे कुटुंबातील संवाद लोप पावत चालला आहे. सध्याच्या युगात वाढलेल्या अपेक्षा, हेवेदावे, चिडचिड यामुळे सुसंवाद हरवत चालला आहे. पतीपत्नीने आवर्जून एकमेकांशी शेअरिंग करायला हवे. एकमेकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली पाहिजे.

एकमेकांना वेळ द्या : आजकाल कुटुंबाला प्रगतीकडे नेण्यासाठी जो तो पैसा कमवित असतो. यात काहीही गैर नाही. पती-पत्नीने पैसा कमवावा जरूर परंतु एकमेकांना आणि कुटुंबालाही वेळ द्यावा. वर्तमानाचे सुख, आनंद त्यावेळीच घेता आले पाहिजे. एकमेकांना वेळ दिल्याने एकमेकांप्रती असणारे ऋणानुबंध अधिक दृढ होत जातात.

चला तर मग आज या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक नवा बदल करूया. पतीपत्नीचे नाते
जन्मोजन्मी अधिकाधिक बहरण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करूया.

Leave A Reply

Your email address will not be published.