व्यक्‍तिमत्त्व – नियोजनाचा धडा  

सागर ननावरे 

परवा एका निवृत्ती समारंभाला जाण्याचा योग आला. माझ्या अगदी जवळच्या मित्राच्या बाबांचा शासकीय सेवेतून निवृत्तीचा समारंभ होता. आम्ही कार्यक्रमाला वेळेवर पोहोचलो, परंतु प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू व्हायला बराच उशीर झाल्याने अनेक जण त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊन निघून गेले. त्यामुळे ऐन कार्यक्रमावेळी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक शिल्लक होते. दुसऱ्या दिवशी तो मित्र खिन्नपणे मला म्हणाला “यार खूप खर्च केला कार्यक्रमासाठी. परंतु केवळ नियोजन न केल्यामुळे कार्यक्रम फसला.’

नियोजनाचे महत्त्व काय असते हे त्याला चांगलेच समजले होते. यावरून मलाही माझ्याबाबत घडलेला एक प्रसंग आठवला.
माझे महाविद्यालयाचे शिक्षण सुरू होते. एके दिवशी अचानक प्राचार्य आमच्या वर्गावर आले आणि पुढील आठवड्यात योग शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले. त्या योग शिबिरासाठी एक प्रख्यात योग गुरू आमच्या महाविद्यालयात येणार होते. त्या कार्यक्रमाची जबाबदारी प्राचार्यांनी आम्हा कला शाखेच्या विद्यार्थ्यांवर सोपविली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आम्हा विद्यार्थ्यांना करायचे होते. आम्ही सर्वांनी एक मीटिंग घेतली त्यात कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल याबाबत चर्चा झाली. चर्चेतूनच आम्ही कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आमची सर्वांची लगबग सुरू झाली. आठवडाभर नियोजन केवळ मनातच ठेवल्यामुळे आमची चांगलीच धांदल उडाली. रात्र थोडी आणि सोंगे फार अशी आमची अवस्था झाली. कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेपेक्षा सुमारे तासभर उशीर झाला. पाहुण्यांचे स्वागत करण्याची वेळ आली. परंतु घाईगडबडीत पुष्पगुच्छ आणायचे विसरल्याचे जबाबदारी घेतलेल्या मित्राने सांगितले. आम्हांला तर चांगलाच घाम फुटला. आता त्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ कुठून आणायचा हा यक्षप्रश्‍न उभा राहिला. तेवढ्यात आमच्या ग्रुपमधील एका मैत्रिणीने तिच्या वेणीतील गुलाबपुष्प काढून दिले. आणि भल्यामोठ्या ट्रेमध्ये ते इवलेसे फूल घेऊन एक मुलगी व्यासपीठावर गेली.

प्राचार्यांनी डोळे मोठे करून त्यांची नाराजी दर्शविली. हा प्रकार पाहुण्यांच्या मात्र लक्षात आला नाही. फूल नाही फुलाची पाकळी हीच महाविद्यालयाची परंपरा असावी, असा त्यांनी समज करून घेतला असावा बहुधा. प्राचार्यांची मात्र दुधाची तहान ताकावर भागविल्याची भावना झाली होती. दुसऱ्या दिवशी त्यावर आम्हाला प्राचार्य आणि शिक्षकांकडून बरेच टोमणे ऐकावे लागले. त्या एका प्रसंगाने आम्हाला थशश्रश्र इशसरप ळी करश्रष ऊेपश या सुविचाराचा प्रत्यय आला होता. मुळात सुरुवातीचे नियोजन योग्य न झाल्याने आमची फजिती उडाली होती.

आयुष्यात कोणत्याही कार्याला प्रारंभ करण्यापूर्वी त्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. असं म्हणतात, एखाद्या कार्याचे सुयोग्य नियोजन झाले असल्यास ते काम अर्धे पूर्ण झाले आहे असे समजावे. नियोजनाविना कार्यास प्रारंभ म्हणजे तलवारीविना युद्धभूमीवर उतरण्यासारखे आहे. बऱ्याचदा आपण नियोजन करतो, पण ते मनात ठेवतो. परंतु जोपर्यंत मनातील ध्येयधोरणे कागदावर येत नाहीत, तोपर्यंत नियोजनाला प्रारंभ होत नाही. एका विदेशी विचारवंताने नियोजनाबद्दल अतिशय मार्मिक भाष्य केले आहे. तो म्हणतो, झश्ररपी रीश पीेंहळपस; श्रिरपपळपस ळी र्शींशीूींहळपस. थोडक्‍यात काय, तर केवळ योजना आखून चालत नाहीत तर त्याचे सुयोग्य नियोजन आपल्याला करता आले पाहिजे. चला तर मग यातून बोध घेऊन नियोजनाला आपल्या कृतीत अग्रस्थान देऊया.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.