– प्रा. वर्षा पाटोळे
कोणत्याही क्षेत्रात मळलेल्या वाटेवरून जाण्यात धन्यता मानणार्यांची संख्या अधिक असते. व्यवस्थेच्या चौकटीत राहूनही आपली सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता जपत नव्या वाटा शोधणारी माणसे दुर्मिळ असतात. या दुर्मिळ माणसांपैकी एक म्हणजे समाजभूषण उत्तमराव पाटील. ते लोकांमध्ये अण्णा म्हणून अधिक परिचित होते.
अण्णांचा जन्म 10 सप्टेंबर 1928 रोजी सोलापूर जिल्ह्यातील भोसे एका छोट्या गावी झाला. दुष्काळामुळे त्यांचे कुटुंब दारिद्य्रात होरपळत होते. आई-वडिलांचे कष्ट बघवत नव्हते म्हणून अण्णांनी आपले शिक्षण मध्येच थांबवून पुण्याचा रस्ता धरला. एका किराणा दुकानात अण्णांना काम मिळाले. दुकान मालकामुळेच ते जेधे मॅन्शनशी जोडले गेले. दुकान मालकाने भांडवल देऊन भेळीचा धंदा उघडून दिला. त्यामुळे अण्णा व्यवसायात स्थिरस्थावर झाले.
देशभक्त केशवराव जेधे आणि बाबुराव जेधे यांना गुरूस्थानी मानून अण्णांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उडी घेतली. वर्ष 1968 मध्ये पुणे महानगरपालिकेचे ते नगरसेवक बनले. बहुजन समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे अण्णांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. त्यांच्यापुढे कर्मवीर भाऊराव पाटील व पंजाबराव देशमुख यांच्या संस्थेचा आदर्श होता. त्यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, श्री शिवाजी मराठा सोसायटी आणि दी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी या चार महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम केले.
अण्णांनी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेमध्ये सदस्य म्हणून आपले कार्य सुरू केले. परंतु प्रामाणिक व कष्टाळू सेवेमुळे पुढे ते चारही संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ बनले. या संस्थांच्या विकासासाठी अण्णांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी संस्थेच्या परिसरामध्ये एक लाख वृक्ष लावले. त्यामुळे संस्थेचा परिसर अपूर्व वनराईने बहरून गेला. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अण्णांची सर्वस्व वेचण्याची तयारी होती. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ध्येयाने ते प्रेरित होते. सत्यशोधक विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. बहुजन विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानज्योत जागविण्यासाठी त्यांनी अविरत कष्ट केले.
झोपडपट्टीवासी व श्रमिकांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यात स्वाभिमान व चैतन्य निर्माण केले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. महात्मा फुले यांच्यावरती ‘ज्योतिगाथा’ व ‘ज्योतीपर्व’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी ते सतत कालसुसंगत असले पाहिजे.
विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण म्हणजे गुणवत्ता या समजातून बाहेर पडून त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, त्यांच्यात नानाविध कौशल्य विकसित व्हावीत आणि पुस्तकाबाहेरचे जगही त्यांना समजावे यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा विचार अण्णांनी नेहमी केला. तो करताना त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांना केंद्रस्थानी ठेवले. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बघून पुणे महानगरपालिकेने अण्णांना ‘समाजभूषण’ म्हणून गौरवले. राज्य शासनाने त्यांना ‘वनश्री’, ‘दलित मित्र’ यासारखे पुरस्कार प्रदान केले.