पिंपरी – मुलगा अभियंता असल्याची व उच्च शिक्षण घेतल्याची बतावणी करुन लग्न केले. लग्न केल्यानंतर विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पती व सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 26 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली असून, पती प्रथमेश दत्तात्रय पाटील, दत्तात्रय पाटील, संगीता पाटील (सर्व रा. दिघी)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाआधी मुलाच्या शिक्षणाविषयी खोटी माहिती देऊन लग्न केले. लग्नानंतर सोन्याचा बांगड्या का केल्या नाहीत ? अशी विचारणा करत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच गाडी घेण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये घेऊन ये, म्हणत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. 8 फेब्रुवारी पासूनच तिला बळजबरीने माहेरी पाठवून देण्यात आले आहे. याप्रकऱणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.