पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामधील नागरी वसाहतीमधील अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तच्या एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. एक रस्ता किंवा गल्लीमध्ये अशा प्रकारच्या जास्तीत जास्त पाच दुकानांनाच परवानगी देण्यात येईल. त्यासाठी प्रभाग स्तरावर क्षेत्रीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
शहरातील सर्व मॉल, व्यापारी संकुल, मार्केट हे लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील. पानटपऱ्या, न्हाव्याची दुकाने, सलून व स्पा सेंटर सुरू करता येणार नाही. त्यांना बंदी कायम राहणार आहे. शहरातील 23 कन्टेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रामध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत राहण्याच्या दृष्टीने जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय ही समिती घेणार आहे. या समितीमध्ये कार्यकारी अभियंत्यांसह अध्यक्ष तर स्थापत्य विभागाचा उपअभियंता, कर निरीक्षक व बीट निरीक्षक यांचा समावेश असेल.
अत्यावश्यक सेवेतील दूध, भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, सर्व प्रकारचे दवाखाने, रुग्णालय, क्लिनिक, प्रसुतीगृहे व औषधांची दुकाने यांना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. समितीकडून दुकानांना परवानगी देताना मिठाई दुकान, बेकरी, हार्डवेअर दुकान, इलेक्ट्रिक दुकाने, चष्मा दुकाने, लहान मुलांच्या कपड्याचे दुकान, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाइलचे दुकान, गॅरेज आदी दुकानांचा प्राधान्यक्रमाने विचार केला जाणार आहे.
गठीत केलेल्या समितीने शहरातील प्रत्येक प्रभागाची रचना विचारात घेऊन प्रत्येक मुख्य रस्ता/चौक/गल्लीमध्ये वरील दुकानांना रोटेशनप्रमाणे आलेल्या अर्जांची छाननी करून परवानगी द्यायची आहे. एकाच गल्लीत एकाच प्रकारच्या दुकानासाठी अनेक अर्ज आल्यास त्यांना सुध्दा रोटेशननुसार परवानगी देण्यात यावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, एकाच प्रभागात अनेक मुख्य रस्ता/चौक/गल्लीमध्ये दुकाने असतील तर ते सुध्दा रोटेशननूसार चालू राहतील. प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत ही दुकाने सुरू राहतील.
येथील दुकानांना नाही मिळणार परवानगी…
समितीमार्फत चिंचवडस्टेशन, पिंपरी कॅम्प, साई चौक, शगुन चौक (पिंपरी), गांधी पेठ, चापेकर चौक (चिंचवड), काळेवाडी मुख्य रस्ता (एमएम स्कूल ते काळेवाडी नदीवरील पुल), अजमेरा कॉलनी (पिंपरी), मोशी चौक, मोशी-आळंदी रस्ता, महाराणा प्रताप चौक, निगडी बसस्टॉप (निगडी), डांगेचौक ते काळेवाडी फाटा, भोसरी-आळंदी रस्ता, कावेरीनगर मार्केट, कस्तुरी मार्केट, थरमॅक्स चौक ते साने चौक, दिघी जकात नाका ते मॅक्झिन चौक, साईबाबा मंदिर आदी ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंशिवाय (जीवनावश्यक वस्तू) अन्य दुकानांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.