नवी दिल्ली – रेल्वेप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता प्लॅटफॉर्मवरच्या विक्रेत्यांकडे आणि कॅन्टीनमध्ये ताजे खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापसून प्रथमच ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र ही सुविधा केवळ खाद्यपदार्थ विक्रीसाठी असणार आहे.
पूर्वी याच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे बंद पाकिटातील पदार्थ विक्रीचीच परवानगी देण्यात आली होती. मात्र, 30 सप्टेंबर रोजी ‘आयआरसीटीसी’ने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेते, फूडप्लाझा, फास्ट फूड विक्रेते, जन आहार, सेल किचन आणि रिफ्रेशमेंट रूमना 31 ऑक्टोबरपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसून पदार्थांचा आस्वाद घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
ज्या विक्रेत्यांचे करार 23 मार्चनंतर संपले आहेत. त्यांनाही परवाना शुल्काच्या 20 टक्के पेमेंटच्या आधारे 31 ऑक्टोबरपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. विक्रेत्यांना काही महिन्यांपूर्वीच बंद पाकिटांमधील पदार्थ विक्रीची परवानगी दिली गेली होती.
तरीही ग्राहकांची मर्यादित संख्या आणि पदार्थांच्य विक्रीवरील निर्बंध यामुळे बऱ्याच विक्रेत्यांनी आपले स्टॉल उघडलेले नव्हते. ते आता सुरू होण्याची अपेक्षा आहे.