नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊनचा तिसरा टप्पा येत्या ४ मेपासून लागू करण्यात येत आहे. असं असलं तरी लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांमध्ये सरकारतर्फे काहीशी शिथिलता देण्यात येत आहे.
केंद्र सरकारतर्फे यापूर्वीच परराज्यात अडकलेल्या विद्यार्थी, कामगार व यात्रेकरूंना प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. यानंतर परप्रांतीयांच्या वाहतुकीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णयही केंद्रातर्फे घेण्यात आला होता. यानंतर आता केंद्र सरकारने आणखी एक निर्णय जाहीर केला असून यानुसार आता देशातील ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार देशभरातील ग्रीन झोन जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीची दुकाने व पानपट्ट्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये विक्री करत असताना ६ फुटांचे (२ गज) अंतर राखणे, दुकानामध्ये एकावेळी ५ पेक्षा अधिक ग्राहकांनी एकत्र न येणे यांचा समावेश आहे.
वृत्तसंस्थेमार्फत मद्य विक्री केवळ ग्रीन झोनमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असली तरी काही वृत्तवाहिन्यांनी संपूर्ण देशभरामध्ये मद्य विक्रीस परवानगी दिली जाईल असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे मद्य विक्री नेमकी कुठे कुठे केली जाणार याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Liquor stores & paan shops will be allowed to function in green zones while ensuring minimum six feet distance (2 gaz ki doori) from each other & ensuring that not more 5 persons are present at one time at the shop: MHA on the extension of #lockdown for two weeks from May 4
— ANI (@ANI) May 1, 2020