मुंबईतील तीन जैन मंदिरांमध्ये प्रार्थनेला परवानगी

नवी दिल्ली – मुंबईतील तीन जैन मंदिरांमध्ये पर्युषण पर्वानिमित्त प्रार्थना करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. कोविड-19 ला नियंत्रित करण्याच्या हेतूने निश्‍चित करण्यात आलेल्या आदर्श कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करून प्रार्थना करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

दादर, भायखळा आणि चेंबूर येथील तीन जैन मंदिरांना अपवाद म्हणून ही परवानगी दिली गेली आहे. मात्र गणेशोत्सवासाठी प्रत्येक मंदिराला महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून स्वतंत्रपणे परवानगी घ्यावी लागेल, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने सांगितले.

15 ते 23 ऑगस्ट दरम्यानच्या पर्युषण काळाच्या निमित्त मुंबईतील कोणतेही मंदिर उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले होते.

आदर्श कार्यपद्धतीचे याचिकाकर्त्यांकडून योग्य पालन केले जाईल, अशी आशा व्यक्‍त केली. जर या कार्यपद्धतीचे पालन होणार असेल तर ज्याप्रमाणे पुरी येथील जगन्नाथ यात्रेला परवानगी दिली गेली होती, त्याप्रमाणे परवानगी दिली जाऊ शकेल असे सांगून मुंबईतील तीन जैन मंदिरांना केवळ अपवाद म्हणून भाविकांसाठी उघडण्याची परवानगी दिली. हे आदेश गणेशोत्सवानिमित्त अन्य मंदिरांना आणि अन्य उत्सवांसाठी लागू होणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.