चंदीगड – पंजाब सरकारने धार्मिक स्थळांमध्ये लंगर सुरू करण्यास आणि प्रसाद वाटपाला अनुमती दिली आहे. त्यानुसार सुवर्णमंदिरात सोमवारपासून लंगर आणि प्रसाद वाटप सुरू झाले आहे.
या निर्णयाचे समर्थन करताना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे की, धार्मिक कार्यात आम्ही हस्तक्षेप न करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आम्ही लंगर व प्रसाद वाटप प्रक्रियेला अनुमती दिली आहे. हा निर्णय केंद्र सरकारनेही घेतला आहे, त्यात शिरोमणी अकाली दल भागीदार आहे. केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनांना आम्ही बांधील आहोत त्यांच्याच अनुमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यानुसार योग्य त्या सुरक्षा व वैद्यकीय उपायांचा अवलंब करून आम्ही या प्रथेला अनुमती दिली आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा वापर करून हे काम सुरू केले जात असल्याचेहीं ते म्हणाले.