पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधीची रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेली डीएसके यांची पुतणी सई वांजपे आणि जावई केदार वांजपे यांना न्यायालयाने बहिणीच्या वर्षश्राद्धच्या कार्यक्रमासाठी हजर राहण्यास परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश जे. एन. राजे यांनी याबाबत आदेश दिला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून डीएसके, त्यांची पत्नी व इतरांवर 2017 मध्ये गुन्हा करण्यात आला होता. ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून डीएसके, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, कंपनीतील अधिकारी धनंजय पाचपोर, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची दोन हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात 33 हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत.
दरम्यान, याप्रकरणात संशयित आरोपी असलेल्या सई आणि केदार यांनी न्यायालयाकडे कविता प्रकाश कुलकर्णी (सई यांच्या बहीण) यांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या प्रथम वर्षश्राद्धच्या कार्यक्रमासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यामध्ये दोघांनी पोलीस एस्कॉर्टचा खर्च करण्याची तयारी देखील दर्शवली होती.