जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेच्या कामांना जिल्हा प्रशासनाची परवानगी

पुणे – करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली टंचाई निवारणाची कामे सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची अत्यावश्यक कामे करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा, पाणी पुरवठा यांना प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे.

उन्हाळ्यात भासणाऱ्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी टंचाई निवारणाच्या अनुषंघाने तसेच पाणी पुरवठा विषयक इतर कामे करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

ग्रामीण भागात नवीन बोअरवेल घेणे, बोअरवेल दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयलज कार्यक्रम, जलजीवन मिशन आदी पाणीपुरवठा अत्यावश्यक कामे, त्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे, वाहने, मनुष्यबळ यांना अत्यावश्यक बाब म्हणून कायदेशीर मंजुरी असलेली कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.