सहधर्मादाय आयुक्तांकडून आदेश : ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिली माहिती
लोणावळा – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या मंदिरात दानपेटीवर गुरव पुजाऱ्यांकडून ठेवले जाणारे ताट कायमचे बंद करण्याचा आदेश सहधर्मादाय आयुक्त, पुणे यांनी दिला आहे. तशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कोळी संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टला अत्यल्प उत्पन्न मिळत आहे. त्यातही देवीच्या दानपेटीतील एकूण रकमेच्या 75 टक्के रक्कम मंदिरातील गुरव पुजारी यांना मिळते. तर उर्वरित 25 टक्के रक्कम देवस्थान ट्रस्टला मिळते. याच मिळणाऱ्या 25 टक्के रकमेमधून ट्रस्टला देवस्थानचा विकास करावा लागतो. मात्र मागील अनेक वर्षांपासून गुरव मंडळीकडून देवीच्या समोरील या दानपेटीवर एक ताट ठेवले जाते, ज्यामुळे येणारे भाविक दानपेटीत पैसे न टाकता त्या ताटात ठेवतात.
ताटातील हे सर्व पैसे गुरव पुजाऱ्यांना मिळतात आणि त्याचा काहीही हिशेब नसतो. ज्यामुळे दानपेटीत कमी रक्कम जमा होते. आणि या अत्यंत कमी रकमेत भाविकांना सोयी सुविधा पुरविताना अडचणी उद्भवतात अशी खंत व्यक्त करीत अनंत तरे यांनी या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यी समितीला हे ताट कायमस्वरूपी बंद करण्याबाबतचे निवेदन दिले होते.
मात्र, तत्पूर्वी यासंदर्भात गुरव पुजाऱ्यांना ताट बंद करण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली होती. खुद्द गुरव प्रतिनिधी विजय देशमुख यांनी दानपेटीवरील ताट बंद करण्याच्या विषयावर देवस्थानच्या अध्यक्षांना अर्ज दिला होता, असेही तरे यांनी सांगितले. याशिवाय दानपेटीतील जी 75 टक्के रक्कम पुजाऱ्यांना मिळते, ती देवस्थानाला भाविकांच्या विकास कामांकरता मिळावी, घटनेत बदल करून ट्रस्ट मध्ये कोळी, आगरी, सीकेपी, सोनार, दैवज्ञ ब्राह्मण आदी भाविकांची संख्या जास्त असावी. तसेच लाभार्थी ट्रस्टींना विश्वस्त म्हणून घेऊ नये, अशा मागण्या असून या संदर्भात न्याय मिळण्यासाठी 14 भाविकांच्यावतीने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, आणि लवकरच त्यावर निर्णय लागण्याची शक्यता असल्याचे तरे यांनी यावेळी सांगितले.