स्थायी समितीचे निर्देश : पारित केलेले प्रस्ताव पुन्हा सादर करा
पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण समितीतील सदस्यांनी काही खास प्रस्ताव मंजूर करून स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठवलेले होते. मात्र, शिक्षण समितीने पाठवलेल्या त्या प्रस्तावांना स्थायी समितीने ब्रेक दिला आहे. शिक्षण समितीने पाठवलेला ठराव अभ्यास करून पाठवलेले नसून या ठरावामध्ये त्रुटी असल्याचे कारण देत स्थायी समितीने सर्वच प्रस्ताव फेटाळले आहेत. हे प्रस्ताव “मलाईदार’ असल्याचा आरोप पूर्वीच शिक्षण समितीवर झाला होता. त्यामुळे, शिक्षण समितीचे “मलई’ मिळविण्यासाठी घाईघाईत पाठवलेले प्रस्तावांमध्ये नेमक्या काय चुका होत्या? याबाबत आज दिवसभर पालिकेच्या आवारात वेगवेगळी चर्चा सुरू होती.
प्राथमिक शाळेतील सातवीतील विद्यार्थ्यांना टॅब खरेदी करण्यात यावा, तसेच महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते दुसरीच्या 11 हजार 208 विद्यार्थ्याकरिता स्वच्छता किट खरेदी करण्याचे प्रस्ताव शिक्षण समितीच्या सदस्यांनी पारित केले होते. शिक्षण समतीच्या सदस्यांनी मंजूर केलेल्या या प्रस्तावांनतर अनेकांनी टीका केली होती. विद्यार्थ्यांच्या टॅबचा उपयोग किती होईल याबाबत साशंकता व्यक्त केली होती. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आडून शिक्षण समितीचे सदस्य मलाईदार निर्णयांना मान्यता देत असल्याचेही चर्चा होत होती. त्यामुळे, शिक्षण समितीचे हे प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी आल्यानंतर त्याला मंजुरी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण समितीने महापालिकेच्या शाळांमध्ये नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक, शिक्षणतज्ज्ञांची नियुक्ती, सातवीतील विद्यार्थ्यांना टॅब खरेदी, पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्याकरिता स्वच्छता किट खरेदी हे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवले होते. मात्र या सर्वच प्रस्तावांना स्थायी समितीने ब्रेक लावला आहे. शिक्षण समितीने सादर केलेल्या सर्व प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे हे सर्वच अभ्यास करुन पुन्हा सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
शिक्षण समितीच्या सदस्यांनी पारित करून पाठवलेले हे प्रस्ताव प्रशासनाने अभ्यास करुन फेरसादर करावेत, असे आदेश स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी दिले आहेत. स्थायी समितीने सर्वच प्रस्तांवाना ब्रेक लावल्यामुळे आता या प्रस्तावात नेमक्या चुका कोणत्या याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे.