नवी दिल्ली : दिल्लीची सत्ता राखणाऱ्या आपने मतांची टक्केवारी कायम ठेवण्यातही यश मिळवले. त्या पक्षाला मागील विधानसभा निवडणुकीत 54.34 टक्के मते मिळाली होती. यावेळी आपला जवळपास तितक्याच म्हणजे 53.60 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली.
दिल्लीत घवघवीत यश मिळवणाऱ्या आपवर मतदारांचा विश्वास कायम असल्याचे मतांच्या टक्केवारीवरून स्पष्ट झाले. जंग-जंग पछाडूनही दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयश आलेल्या भाजपला जागांमध्ये आणि मतांमध्ये झालेल्या वाढीत समाधान शोधता येणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला 32 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली होती.
यावेळी त्यामध्ये 6 टक्क्यांची भर पडली. दिल्ली विधानसभा निवडणुकांत मतांचा विचार करता भाजपची वैयक्तिक कामगिरी दुसऱ्या क्रमांकाची ठरली. त्या पक्षाला 1993 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत 42.82 टक्के मते मिळाली होती.
दिल्लीतील सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत खातेही उघडू न शकलेल्या कॉंग्रेसला मतांबाबतही धक्का बसला. कॉंग्रेस दिल्लीत सलग पंधरा वर्षे (1998 ते 2013) सत्तेवर होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकांत कॉंग्रेसला सातत्याने 40 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली.
मात्र, आपच्या उदयानंतर त्या पक्षाच्या मतांमध्ये प्रचंड घट सुरू झाली. मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 9.65 टक्के इतकीच मते मिळाली. यावेळी ते प्रमाण अवघे 4.27 टक्के इतके आहे. कॉंग्रेसची ही कामगिरी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या इतिहासातील नीचांकी ठरली आहे.