पेप्सिको शेतकऱ्यांशी तडजोड करण्यास तयार

नवी दिल्ली – पेप्सिको कंपनीने तिच्या नावावर नोंद असलेले बटाट्याचे बियाणे परवानगी न घेता वापरल्याबद्दल गुजरातमधील शेतकऱ्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती. आता कंपनीने या शेतकऱ्याबरोबर न्यायालयाबाहेर तडजोड करण्याचा मुद्दा पुढे केला आहे.

कंपनीने एफसी-5 हे बियाणे स्वतःच्या नावावर नोंदवलेले आहे. लेज या बटाट्याच्या चिप्ससाठी हे बटाटे वापरले जातात. मात्र, गुजरातमधील काही शेतकऱ्यांनी परवानगी न घेता बटाट्याचे हे वाण वापरले असल्याचे पेप्सिको कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने या शेतकऱ्याविरोधात बरीच मोठी नुकसानभरपाई मागितली होती. अहमदाबाद येथे न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी कंपनीने सांगितले की, या शेतकऱ्यांनी नियमानुसार कंपनीची परवानगी घेऊन बटाट्याचे हे पीक घेऊन कंपनीला परत विकले तर आमची काही हरकत नाही.

शेतकऱ्यांच्या वकिलांनी यावर 12 जून रोजी आपले मत मांडणार असल्याचे सांगितले. आता हा निकाल लागेपर्यंत शेतकऱ्यांनी हे बियाणे वापरू नये, असे न्यायालयाने शेतकऱ्याला सांगितले.

कंपनीने म्हटले आहे की आमचा देशातील हजारो शेतकऱ्यांबरोबर विशिष्ट बियाणे वापरून पीक घेण्याचा आणि कंपनीला ते परत विकण्याचा करार झालेला आहे. मात्र, कंपनीची परवानगी नसताना ते बियाणे इतर शेतकऱ्यांनी वापरल्यानंतर त्याचा कंपनीबरोबरच कंपनीशी करार झालेल्या शेतकऱ्यावर परिणाम होणार आहे.

अहमद पटेल यांची पेप्सिको कंपनीवर टीका

दरम्यान, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी या अनुषंगाने पेप्सिको कंपनीवर टीका केली आहे. शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेण्याचा अधिकार असल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने या घडामोडींकडे दुर्लक्ष न करता ज्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन पटेल यांनी केले आहे. त्याचबरोबर देशातील काही शेतकरी संघटना आणि व्यक्तींनीही या शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.