वाल्हे – ‘भुयारी मार्गाच्या प्रश्नाला आश्वासन, चर्चेची फोडणी’ या मथळ्याखाली शुक्रवारी (दि. 11) दैनिक ‘प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच या वृत्ताची खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने दखल घेत बुधवारी (दि. 16) येथील परिस्थितीची पाहणी केली तर गुरुवारी (दि. 17) रेल्वे प्रशासनाकडूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने स्थानिकांनी ‘प्रभात’चे आभार मानले असून प्रश्न तडीस जाईपर्यंत पाठपुरवा सुरू ठेवावा, अशी मागणी केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी वाल्हे येथील पालखी तळ, सुकलवाडी तसेच इतर वाड्या-वस्त्यांना जाणार्या मुख्य रस्त्यावरील भुयारीमार्गाची पाहणी केले होती. येथील ग्रामस्थ, प्रवाशांच्या समस्या जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने खासदार सुप्रिया सुळे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक तथा मध्य रेल्वेचे सदस्य प्रवीण शिंदे यांनी रेल्वे प्रशासन योग्य सूचना देण्यात आल्या होत्या. तर गुरुवारी प्रत्यक्षात रेल्वे प्रशासनाकडून भुयारीमार्गा पासून ते करंजनाला ओढा येथील सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार कामे सुरू…
भुयारी मार्गापासून थोड्या अंतरावर खोदलेल्या विहिरीमध्ये भुयारी मार्गातील पाणी सोडले जात होते. त्याच विहिरीमध्ये मोटर पंप बसविण्यात आला असून, त्यासाठी 24 तास कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार, भुयारीमार्गापासून ते करंजनाला ओढा, या जागेच्या सर्वेक्षणाचे कामदेखील प्रत्यक्षात सुरू करण्यात आले असून, याबाबतचा अहवाल लवकरच रेल्वे प्रशासनाकडून ग्रामस्थांना सादर करण्यात येणार आहे.